पुणे : महापालिकेतील नवनियुक्त कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होऊन दीड वर्षे पूर्ण होऊन सुद्धा अद्याप त्यांना आगीपासून बचाव करण्याचे स्वसंरक्षण साहित्य दिले गेले नाही व काही नवनियुक्त फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांना (Fire brigade) आग विझवतांना शरीर भाजल्याने गंभीर जखमा झाल्या आहेत अशी धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे. पुणे महानगरपालिका (Pune) अंतर्गत अग्निशामन विभागाचे 23 उपकेंद्रे असून अग्निशमन दलाचे मुख्यालय गंज पेठ,लोहिया नगर,पुणे महानगरपालिकेची भांडार विभाग यांना मानवाधिकार कार्यकर्ते मनिष देशपांडे यांनी माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन मुख्यालय व उपकेंद्रांमध्ये 2024 साली नव्याने नियुक्त झालेल्या अग्निशामक विमोचक/फायरमन हे तब्बल 167 कर्मचारी आहेत. तसेच या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होऊन दीड वर्षे पूर्ण होऊन सुद्धा अद्याप गणवेश व स्व संरक्षण साहित्य दिले गेले नाही.विशेष बाब म्हणजे या कर्मचाऱ्यांना फायर सुट म्हणजेच आगीपासून बचाव करणारे स्वसुरक्षा साहित्य सुद्धा दिले नसल्याची धक्कादायक त्यांनी केलेला तक्रारीतून आणि माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.
अग्निशमन विभागाच्या या कर्मचाऱ्यांना फायर सुट म्हणजेच आगीपासून बचाव करणारे स्वसुरक्षा साहित्य न देणे म्हणजे त्यांचा जीव जोखिमेत टाकणे व त्यांच्या प्रती महापालिकेने आसवेंदनशीलता दाखविणे असल्याचे एड. असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. याबाबत जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे कार्यकर्ते मनीष देशपांडे यांनी आयुक्त पुणे महानगरपालिका आणि मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना तक्रार केली होती. तसेच पुणे महानगरपालिका कामगार युनियन याचे अध्यक्ष उदय भट यांना सुद्धा लेखी पत्र देऊन लक्ष देण्याची विनंती केली होती पण कुणीही या विषयाबाबत गंभीरता दाखविलेली नाही. दिवाळीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात आगी लागण्याच्या घटना घडतात आणि अश्यावेळी महापालिकेची अनास्था फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतणारी असू शकते अशी चिंता अँड. असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे.
दुर्घटना होऊनही दखल नाही (Pune kodhava fire brigade)
अतिदक्षता व अत्यावश्यक सेवेत असलेला हा विभाग प्रशासकीय प्रक्रिया आणि कागदपत्रांमध्ये अडकलेला आहे. अत्यावश्यक सेवा असलेल्या विभागामध्ये त्यांच्या संदर्भात असलेल्या समस्या विषयी आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनीच नव्हे तर मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे असे मत कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केले. कोंढवा परिसर उंड्री येथे नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेमध्ये घरगुती गॅस सिलेंडर चा स्फोट होऊन अग्निशमन दलातील नवनियुक्त फायरमन जवान विश्वजीत वाघ व पृथ्वीराज खेडकर हे दोन जवान स्वसुरक्षा साहित्य म्हणजेच फायर सुट नसल्यामुळे गंभीर भाजले गेले होते. तरीही अद्याप नवनियुक्त फायरमन जवानांना गणवेश आणि फायर सुट दिले गेलेले नसून या मानवी हक्क उल्लंघन समस्या बाबत उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असे एड. श्रीया आवले यांनी सांगितले.
हेही वाचा
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका पुढे ढकला; एकनाथ शिंदेंचा पलटवार, 'सन्नाटा'वरुन राज ठाकरेंनाही टोला