Pune: केवळ 25 वर्षीय तरुण महिलेच्या पोटात झपाट्याने वाढणारी मोठी गाठ असल्याने ती उपचारासाठी दाखल झाली होती. सुरुवातीला ही गाठ मोठ्या गर्भाशयातील फायब्रॉईड (uterine fibroid) असल्याचा संशय होता. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान अनपेक्षित निष्कर्ष समोर आला, ही गाठ गर्भाशयाशी संबंधित नसून आतड्यांच्या भोवती असणाऱ्या मेसेन्टरी भागातून निर्माण झालेली स्पिंडल सेल ट्यूमर (Spindle Cell Tumor) असल्याचे स्पष्ट झाले.
25 वर्षीय तरुणीत जगातील पहिलेच निदान
ही जटिल शस्त्रक्रिया स्त्रीरोगतज्ञ डॉ. गौरी जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली मदरहुड हॉस्पिटल, खराडी येथे यशस्वीरीत्या पार पडली. शस्त्रक्रियेदरम्यान संपूर्ण गाठ सुरक्षितपणे काढून टाकण्यात आली. १५ सेमी आकाराची हि गाठ पुढील तपासणीसाठी पाठविण्यात अली होती. तपासणीत ही गाठ Low Malignant Potential असलेली (कॅन्सरकारकतेच प्रमाण अत्यल्प असलेली, जवळपास नसलेली), स्पिंडल सेल ट्युमर (Spindle Cell Tumor) असल्याचे निदान झाले. जागतिक पातळीवर उपचारणाची जी माहिती उपल्बध आहे, त्या माहितीच्या अभ्यासानुसार, चाळीशीच्या आतील महिलेस हा ट्युमर इतका मोठा आकाराचा होण्याची हि जगातील पहिलीच वेळ आहे. त्यातच आणखी एक आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आला, रुग्णाच्या ऊतींच्या मॉलिक्युलर चाचणीत पोटातील प्रसारित क्षयरोग (Disseminated Abdominal Tuberculosis) सुद्धा आढळला. म्हणजेच एका रुग्णामध्ये दोन वेगळे आणि दुर्मिळ आजार मेसेन्टरी ट्यूमर आणि पोटातील प्रसारित क्षयरोग एकाच वेळी आढळले, हे जगातील दुर्मिळात दुर्मिळ उदाहरण म्हणावे लागेल. पोटातील प्रसारित क्षयरोगाचे प्रमाण हे एकूण क्षयरोगाच्या रुग्णाच्या तुलनेत केवळ 2 ते 3% असते. 1 कोटी लोकसंख्येमागे केवळ 7 जणांना हा आजार होत असल्याचे दिसून येते.
सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर
डॉ. गौरी जगदाळे म्हणाल्या, “या रुग्णाचे लक्षणे पाहता सुरुवातीला सामान्य फायब्रॉईडचा निष्कर्ष निघाला व शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र शस्त्रक्रियेनंतर आणि तपशीलवार तपासण्यांमुळे हे अत्यंत दुर्मिळ निदान असल्याचे समोर आले. पोटातील गाठींच्या निदानात नेहमी व्यापक तपासणी आणि मॉलिक्युलर चाचण्या करणे आवश्यक आहे, विशेषतः क्षयरोग प्रचलित असलेल्या भागात. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिच्यावर ऑंकोलॉजिकल तसेच क्षयरोगावरील उपचार (anti-tubercular treatment) सुरू आहेत. पुढील काही वर्षे नियमित फॉलो-अप करून गाठीची पुनर्वाढ होत नाही यावर लक्ष ठेवले जाईल, असे डॉ. जगदाळे यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ गौरी जगदाळे यांच्यासह शल्यचिकित्सक डॉ. सुशील देशमुख, भूलतज्ज्ञ डॉ. मोनाली व मदरहूड रुग्णालयातील टीमचे सहकार्य लाभले.
