पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 24 वर्षांच्या महिलेवर योग्य उपचाराऐवजी मंत्रतंत्राचा वापर करणाऱ्या डॉक्टरविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये मंगळवारी रात्री डॉ. सतीश चव्हाणांविरोधात गुन्हा दाखल झाला.


जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत डॉक्टरवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊनही अद्याप डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे ज्या मांत्रिकानं हा सगळा प्रकार केला, तोही मोकाट आहे.

महिलेवर उपचार करण्यासाठी चक्क डॉ. सतीश चव्हण यांनी मंत्रतंत्राचा वापर केल्याचं समोर आलं होतं. दुर्दैवाने या घटनेत संध्या सोनवणे या विवाहितेला प्राण गमवावे लागले.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील स्वारगेट परिसरातील डॉ. सतीश चव्हाण यांच्याकडे संध्या सोनवणे ही 24 वर्षीय महिला उपचारासाठी आली होती. तिच्या छातीत दुधाची गाठ झाल्याचा अहवाल आला. मात्र ऑपरेशन केल्यानंतर तिची प्रकृती खालावली.

संध्याला तातडीने पुण्यातील डॉ. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे डॉ. सतीश चव्हाण यांनी एका मांत्रिकाला बोलावून मंत्रतंत्राचा वापर केला. याबाबत जाब विचारला असता, देव आणि मांत्रिकावर आपली श्रद्धा असल्यामुळे हे मंत्रोपचार करत असल्याचं डॉ. चव्हाण म्हणाले.

इतकंच नाही, सात ते आठ ही धोक्याची वेळ असल्यामुळे दहा ते अकरा या वेळेत शस्त्रक्रिया करण्याचंही डॉ. चव्हाणांनी सुचवल्याचं संध्याच्या भावाने सांगितलं. अखेर संध्या सोनवणेचा रुग्णालयातच मृत्यू झाला.
संबंधित बातम्या :

दीनानाथ रुग्णालयात डॉक्टरानेच मांत्रिकाला बोलावलं, महिलेचा मृत्यू

पाहा व्हिडिओ :