पुणे : पुण्यातील एका कौटुंबिक न्यायालयाने पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या एका दाम्पत्याचा स्काईपवरुन काडीमोड झाला.


पती सिंगापूरमध्ये नोकरी करतो, तर पत्नी लंडनमध्ये. लग्न झाल्यानंतर दोनच महिन्यात ते वेगळे राहायला लागले. कायदेशीररित्या विभक्त होण्यासाठी त्यांनी अर्ज केल्यानंतर कोर्टाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घटस्फोट मंजूर केला.

सिंगापूरमध्ये नोकरी करणारा पती शनिवारी पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात हजर राहिला होता. मात्र लंडनमध्ये असलेली पत्नी कामामुळे कोर्टात उपस्थित राहू शकली नाही. त्यामुळे सीनियर डिव्हिजन जजनी स्काइपवरुन तिची बाजू ऐकली.

मे 2015 मध्ये अमरावतीत दोघं विवाहबद्ध झाले. त्यानंतर लगेच ते पुण्यात राहायला आले. पुण्यातील वेगवेगळ्या कंपनींमध्ये दोघंही कार्यरत होते. पुण्यात त्यांनी एक घरही विकत घेतलं होतं. महिन्याभरात पतीला सिंगापूरमध्ये नोकरीची ऑफर मिळाली, तर पत्नीला लंडनमध्ये.

पती तात्काळ सिंगापूरला निघून गेला. त्यामुळे तिला काही काळ पुण्यातच थांबावं लागलं. अखेर 30 जून 2015 नंतर दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला.