पुणे : चहा न दिल्याच्या रागातून ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांची पत्नी दीपाली कोल्हटकरांची हत्या झाली आहे. आरोपी किसन मुंडे प्राथमिक तपासात पोलिसांना ही कबुली दिल्याची माहिती आहे.

दिलीप कोल्हटकर पुण्यातील कर्वेनगरमधील घरात 65 वर्षीय पत्नी दीपाली आणि 85 वर्षीय सासूसह राहतात. उस्मानाबादच्या 19 वर्षीय किसन अंकुश मुंडेला काही दिवसांपूर्वीच शुश्रूषेसाठी मदतनीस म्हणून ठेवण्यात आलं होतं. कोल्हटकर यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा अमेरिकेत असतो. तर मुलगी कर्वेनगर परिसरातच वास्तव्यास आहे.

कोल्हटकरांकडे दिवसपाळी आणि रात्रपाळीसाठी दोन नोकर आहेत. कोल्हटकर यांच्या घरातील स्वयंपाकघरातून गुरुवारी (8 फेब्रुवारी) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास धूर निघू लागल्याने शेजाऱ्यांनी धाव घेऊन पाहिलं असता दीपाली कोल्हटकर या जळालेल्या अवस्थेत आढळल्या.

पोलिसांना याची माहिती देऊन त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

शवविच्छेदनात दीपाली कोल्हटकर यांच्या डोक्याला गंभीर जखम असल्याचं आढळलं. गळा दाबून आणि डोक्यात जड वस्तूने प्रहार करुन झाल्याचं निष्पन्न झालं होतं. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

कोल्हटकरांकडे नव्याने ठेवलेला नोकर रोज रात्री बारापर्यंत थांबायचा, मात्र घटनेच्या दिवशी एक तास आधीच निघून गेल्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. त्यानुसार पोलिसांनी किसन मुंडेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्या केल्याचं कबूल केलं होतं. दीपाली यांनी चहा न दिल्यामुळे रागाच्या भरात त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपीने प्राथमिक तपासात पोलिसांना दिली आहे.

संबंधित बातमी :


नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू


नाटककार दिलीप कोल्हटकरांच्या पत्नीची नोकराकडूनच हत्या