Pune Crime News : येरवडा कारागृहात कैद्याच्या (Yerawada Jail )   खुनानंतर मयताचे नातेवाईक पुण्यातील ससून रुग्णालयात आक्रमक झाले आहे. कारागृह पोलिसावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे. जोपर्यंत पोलिसावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असा आक्रमक पावित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. 


काल सायंकाळच्या सुमारास महेश चंदनशिवे या कारागरातील कैद्याचा कारागृहातील बंदी असलेल्या कैद्यांच्या टोळक्याने खून केला होता. हत्येच्या या घटनेमुळे येरवडा कारागृह पुन्हा एकदा हादरलं होतं. महेश महादेव चंदनशिवे असं हत्या झालेल्या आरोपीचे नाव. पूर्व वैमान्यासातून 4 कैद्यांकडून महेशची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. चारही आरोपींच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैचीने आणि धारदार हत्याराने मानेवर वार करत महेशची हत्या करण्यात आली होती. मात्र यासंदर्भात आता चंदनशिवे यांचं कुटुंब आक्रमक झालं आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल करा नाही तर मृतदेह स्विकारणार नाही, असं म्हणत कुटुंब आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


ससून रुग्णालयाच्या आवारत नातेवाईकांचा ठिय्या


ससून रुग्णालयात महेश चंदनशिवेचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. मात्र नातेवाईक हा मृतदेह स्विकारण्यास नकार देत आहे. ससून रुग्णालयाच्या बाहेर अनेक नातेवाईक जमले आहेत. त्यांनी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ज्यावेळी सगळे मिळून महेशला मारहाण करत होते त्यावेळी पोलीस प्रशासन कुठे होतं शिवाय जेल प्रशासनदेखील कुठे होतं? असा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. मागील काही तासांपासून नातेवाईकांनी ससून समोर ठिय्या मांडला आहे. 


पूर्ववैमानस्य मनात ठेवून हत्या



अनिकेत समदूर, महेश तुकाराम माने, गणेश हनुमंत मोटे आणि आदित्य संभाजी मुरे अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, तोडफोड करणे, दुखापत करणे, घातक शस्त्र, अग्नीशस्त्र बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, दराेडा घालणे, चोरी अशा आरोपांखाली महेश हा येरवडा कारागृहात होता. दरम्यान, इतर चौघे संशयित देखील विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात होते. पण पूर्ववैमानस्य मनात ठेवून या चौघांनी कारागृहात महेशची हत्या केली. दरोड्याची तयारी करून अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात महेश चंदनशिवे हा 30 नोव्हेंबर 2022 पासून येरवडा कारागृहात होता. 


इतर महत्वाची बातमी-


Ahmednagar : रात्रीच्या वेळी अनोळखी लोकांना लिफ्ट दिली आणि त्यांनी कार चालकाला लुटलं; डोक्यात हातोडा मारून गाडी, मोबाईल, कॅश घेऊन पोबारा