पुणे: पिंपरी चिंचवडमधील वृद्ध उद्योजकांच्या घरी दरोडा टाकणाऱ्या कुख्यात आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या आरोपींनी मोबाईल नाही तर चालाखीने वॉकी टॉकीचा वापर करत पोलिसांना ही चकवा दिला होता. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी शिताफीने प्रवास करत, तब्बल 1200 किलोमीटरचा पाठलाग करुन आरोपींच्या मुसक्या आळवल्या आहेत. सुभाष बिष्णोई, सुरेश ढाका आणि महिपाल बिष्णोई अशी अटकेतील तिघांची नावं आहेत. या तिघांनी वृद्ध उद्योजकांच्या घरात 19 जुलैला प्रवेश केला, बंदुकीचा धाक दाखवत वृद्धाचे हात-पाय बांधले आणि घरातील ऐवज लंपास केला होता. दोन महिने याचा कट शिजत होता, हे पोलीस तपासात समोर आलं आहे. या तिघांना मदत करणाऱ्या आरोपींचा ही शोध सुरु आहे.

दोन महिन्यांपासून दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा कट रचला

दरोड्याच्या गुन्ह्यातील या कुख्यात आरोपींना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीसांची दहा पथक दरोडेखोरांचा शोध घेत होते, 19 जुलै रोजी निगडित वृद्ध व्यक्तीला गाठून आरोपीने दरोडा टाकला होता, दरोड्यामध्ये सहा लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला होता, सीसीटीव्ही आणि वाहनावरून मुख्य सूत्रधार सुभाष बिष्णोई, महिपाल बिष्णोई आणि सुरेश ढाका यांना अटक करण्यात आली आहे, सुरेश ढाकावर गंभीर स्वरूपाचे 21 गुन्हे दाखल आहेत, मोबाईल ट्रेस होऊ नये यासाठी दरोडेखोरांनी वाकी टॉकीचा वापर केला होता, पोलिसांनी चार वाकी टॉकी जप्त केल्या आहेत, दोन महिन्यांपासून दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा कट रचला होता, हे सर्व पोलीस तपासात समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

वॉचमनसह त्याची पत्नी व दोन मुलांनाही हातपाय बांधून खोलीत कोंडले

मिळालेल्या माहितीनुसार,  पिंपरी- चिंचवड परिसरात 19 जुलै रोजी सायंकाळी चंद्रभान अगरवाल, वय 76, या वृद्ध उद्योजकाच्या बंगल्यात घुसून पाच दरोडेखोरांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हातपाय बांधले आणि घरातील कपाटामधील सोन्या-चांदीचे दागिने, महागडी घड्याळे असा तब्बल सहा लाख 15 हजार रुपयांचा ऐवज लुटला आणि ते पसार झाले. या दरोडेखोरांनी दरोडा घातला त्या ठिकाणी एका खोलीत राहणाऱ्या वॉचमनसह त्याची पत्नी व दोन मुलांनाही हातपाय बांधून खोलीत कोंडले होते. त्यानंतर ते पसार झाले. या घटनेनं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

पथकाने सुमारे 1200 किलोमीटर प्रवास केला अन्...

या घटनेनंतर पोलिसांची पथकं तयार केलं, त्यांनी या दरोड्याचा कसून शोध घ्यायला सुरूवात केली, या पथकाने सुमारे 1200 किलोमीटर प्रवास केला. शहरासह अन्य धागेदोरे तपासण्यासाठी 200 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासात राजस्थान येथील जयपूरमधून सुरेश ढाका याला अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, चार वॉकी टॉकी, दोन मोबाइल, सोन्याचे दागिने, फिर्यादीचे पाकीट, आधार कार्ड, गाडीचे आरसी बुक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर, महिपाल विष्णोई याला तळेगाव येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून फिर्यादीच्या पत्नीच्या सोन्याच्या बांगड्या, कानातले, घड्याळ आणि बनावट नंबरप्लेट जप्त करण्यात आली. राजस्थान आणि गुजरात राज्यांत या आरोपींवर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आदी 21 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीत एक महिला आरोपी आणि इतर तीन आरोपींचा सहभाग असून, लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.