पुणे: कायद्याची भीती कुणाला राहिली नाही, अस प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात वारंवार घडताना दिसत आहेत. आता एका तरूणाने मद्यधुंद अवस्थेत भर चौकात कार थांबवून लघुशंका केली आणि त्यानंतर अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्या तरूणाचा शोध सुरू केला आहे.
येरवडा परिसरातील शास्त्रीनगर परिसरातील घटना
ही घटना पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथे घडली आहे. परिसरातील सिग्नलवर कार थांबवून गौरव अहुजा नावाच्या तरुणाने भर रस्त्यात लघुशंका केली आणि त्यानंतर त्याला प्रश्न विचारणाऱ्या एका व्यक्तीसोबत अश्लील वर्तन केले. हा संपूर्ण प्रकार एका व्यक्तीने मोबाइल कॅमेऱ्यात कैद करून माध्यमांकडे दिला. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनीधींनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.
गौरव फरार, पोलिसांचा शोध सुरू
ही घटना व्हायरल झाल्यानंतर गौरव अहुजा सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या वडिलांच्या नावावर ही कार नोंदणीकृत आहे. या घटनेनंतर गौरवच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
वडिलांनी काय दिली प्रतिक्रिया
गौरवच्या वडिलांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हणाले, "गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते. गौरवने सिग्नलवर नाहीतर माझ्या तोंडावर लघूशंका केली आहे. गौरवचा मोबाइलच सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी कारवाई होईल, ती मला मान्य आहे," अशी प्रतिक्रिया तरूणाच्या वडिलांनी एका मराठी वृत्तावाहिनीशी संवाद साधताना दिली आहे. गौरव अहुजा आणि त्याच्या मित्रावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी माहिती देाना सांगितलं की, "तरुण अल्पवयीन नाही. सार्वजनिक ठिकाणी अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन, रहदारीस अडथळा निर्माण करणे, यासह विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. व्हिडिओत बिअरची बाटली दिसत असल्याने मद्यप्राशनाची खात्री पटवून पुढील कारवाई केली जाईल," पोलिसांचा तपास सुरू असून, लवकरच आरोपीला अटक केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
गौरव अहुजा आणि त्याच्यासोबत असलेल्या मित्रावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरूण अल्पवयीन नाही. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव, अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन, रहदारीस अडथळा निर्माण करणे, अशा कलमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. तरूणाने मद्य प्रशान केले होते की नाही, हे ताब्यात घेतल्यानंतर पाहून कारवाई करणार आहोत. पण, सध्यातरी व्हिडिओत बिअरची बाटली दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर काही कलमे लावण्यात आलेली आहेत," अशी माहिती पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली आहे.