पुणे: पुण्यातील नांदेड सिटीमध्ये असलेल्या मधुवंती सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहनाला स्टिकर नाही म्हणून फ्लॅट मालकाला शिवीगाळ करण्यात आली, त्यानंतर त्यांच्या मुलाने जाब विचारल्यावर त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. नांदेड सिटी टाउनशिप सिक्युरिटी आणि अश्विनी नामक महिलेवर नांदेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 4.30 वाजता घडला आहे. नांदेड सिटी भागातील मधुवंती सोसायटीमधून सुरक्षारक्षकांचा हा मुजोरीपणा समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सोसायटीतच राहणाऱ्या तरुणाला सुरक्षा रक्षकांकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या पती आणि 2 मुलांसह (एक मुलगा आणि एक मुलगी) नांदेड सिटीमध्ये असलेल्या मधुवंती सोसायटीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून राहतात. फिर्यादी यांचे पती रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. 8 एप्रिल रोजी संध्याकाळी  4.30 वाजता फिर्यादी यांचे पती घरी जाण्यासाठी त्यांच्या मधुवंती सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आले. त्याठिकाणी नांदेड सिटीचे सिक्युरिटी गार्ड यांनी फिर्यादी यांच्या पतीच्या गाडीला सोसायटीचे स्टिकर नसल्याने थांबवून ठेवले. 

तेव्हा फिर्यादी या त्यांच्या मुलासह सोसायटीचे रेसीडेन्स कार्ड घेवून गेटवर गेले. यावेळी गेटवर फिर्यादी यांच्या पतीशी तेथे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक वाद घालून अरेरावीची भाषा करत होते. हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी यांचा मुलगा पुढे सरसावला तर त्याचे सुद्धा त्याठिकाणी जमा झालेल्या सुरक्षा रक्षकांशी वाद झाले. या भांडणामध्ये 8-10 सुरक्षा रक्षकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आला आहे मारहाण केल्यानंतर संबंधित कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. 

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

या संबंधित घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये काहीजण एका तरूणाला मारहाण करताना दिसत आहेत. तर एक महिला त्या तरूणाला त्या मारहाणीपासून वाचवण्याचा आणि मारहाण करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.