पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडे याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शंतनू कुकडे (Shantanu Kukde) हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय होता. त्याचमुळे पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्षपद त्याच्याकडे सोपवण्यात आलं होतं. (Pune Crime) कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अजित पवारांवर विरोधकांनी टीकेची झोड उडवली होती. त्यानंतर आता शंतनू कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली आहे. अल्पसंख्याक विभागाच्या उपाध्यक्ष पदाचा कुकडे याने 26 डिसेंबर 2024 मध्येच राजीनामा दिला आहे. तब्येतीच्या कारणास्तव कुकडे याने राजीनामा दिल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माहिती आहे. त्याचा राजीनामा देखील समोर आला आहे.
कोण आहे शंतनू कुकडे?
शंतनू कुकडे पुण्यात गरजू लोकांसाठी एक एनजीओ चालवतो. धंगेकर यांनी आरोप केल्याप्रमाणे, पुण्यात डान्स बार-कम-पब चालवण्याचाही त्यांच्यावर आरोप आहे, शंतनू कुकडे रेड हाऊस फाउंडेशन नावाच्या एनजीओचा प्रमुख आणि संस्थापक आहेत. कुकडे हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे. त्यांची स्वयंसेवी संस्था पुण्यातील विविध भागात गरजू लोकांना मदत साहित्य वाटप करत असे. गेल्या वर्षी, त्यानी त्याच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत, डीएसके ग्रुपने गुंतवणूकदारांच्या कथित फसवणुकीबाबत त्यांचे वकील चंद्रकांत बिडकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (जनहित याचिका) दाखल केली.
नेमकं काय प्रकरण?
शंतनू कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना काही गोष्टी समोर आल्या. त्यामध्ये आणखी एक फिर्यादी समोर आली आहे. त्या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नमूद केल्यानुसार, शंतनू कुकडे हा मुख्य आरोपी आहे. पीडित महिला ही गेल्या चार-पाच वर्षांपासून शंतनू कुकडे याला ओळखत होती. शंतनू कुकडे हा पुण्यात एक संस्था चालवत होता. या संस्थेत शंतनू कुकडे याने पीडित तरुणीला राहण्यासाठी जागा दिली होती. यादरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. एक-दोन वर्षांनी शंतनूचे मित्रही तिकडे येऊ लागले. हे सगळेजण अनेकदा बाहेरही जायचे. या मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. यामध्ये शंतनू कुकडे याच्यासह 9 जण आरोपी आहे. पीडित तरुणी मूळची भूतानची आहे. काही वर्षांपूर्वी ती पुण्यात नोकरी आणि शिक्षणाच्या उद्देशाने आली होती. पुण्यात ती ऋषिकेशला भेटली. त्याच्यासोबतही तरुणीचे संबंध होते. ऋषिकेशने या तरुणीची ओळख शंतनूशी करुन दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
काय लिहलंय राजीनामा पत्रात?
प्रति, मा. प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य पक्ष कार्यालय, मुंबई
यांस
विषय : माझ्या कामाचा व्याप जास्त वाढल्याने मला माझी तब्येत खालावली असल्याने तसेच मानसिक स्थिती चांगली नसल्याकारणाने मला पक्ष कार्यासाठी जास्त वेळ देता येत नसल्याने मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.
महोदय,आपणास वरील उपरोक्त विषयान्वये अर्ज करतो की, मी शंतनु कुकडे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अल्पसंख्यांक विभाग उपाध्यक्ष व सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे. माझ्या कामाचा जास्त व्याप वाढल्याने मला पक्षकार्यासाठी जास्त वेळ देता येत नाही. तरी आपण माझ्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा स्वीकारावा ही विनंती.