ट्रेंडिंग
Pune News: नशेत चक्क वाहतूक पोलिसांचीच धरली गचांडी अन्..., पुण्यातील नवले ब्रिजजवळ धक्कादायक प्रकार, व्हिडिओ आला समोर
Navale Bridge Pune: पुण्यात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात होतात त्या नवले ब्रिजवरती ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह तपासणी दरम्यान एका मद्यपी व्यक्तीने थेट वाहतूक पोलिसांना दमबाजी केली आणि थेट गचांडी धरली.
पुणे: पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अपघातांची संख्या वाढली आहे. अपघाताची संख्या कमी होण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासन वारंवार कारवाई करत असल्याचं चित्र आहे. अशातच मोठ्या प्रमाणावर अपघात होत असलेल्या पुणे शहरातील नवले ब्रिजजवळ काल (शुक्रवारी) रात्री उशिरा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहतूक पोलिसांकडून नियमितपणे केल्या जाणाऱ्या ड्रंक अँड ड्राइव्ह तपासणी दरम्यान एका मद्यधुंद व्यक्तीने चक्क पोलिसांनाच दमदाटी करत त्यांची गचांडी धरल्याची घटना घडली आहे. हा प्रकार , संबंधित व्यक्तीला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय घडलं?
शहरातील वाहतूक विभागाकडून नवले ब्रिज परिसरामध्ये मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई सुरु होती. यावेळी एक दुचाकीस्वार संशयास्पद आणि मद्यधुंद अवस्थेमध्ये दिसत असल्यामुळे त्याला संबंधित अधिकाऱ्यांकडून थांबवण्यात आलं. मद्याचा वास जाणवताच पोलिसांनी त्याची त्याची टेस्ट घेतली. टेस्टमध्ये तो दारू पिऊन गाडी चालवत असल्याचं आढळून आलं. टेस्टमध्ये तो ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे समोर येताच संबंधित व्यक्ती आक्रमक झाला. त्याने चक्क उपस्थित पोलिसांवर आरडाओरडा करायला सुरूवात केली, पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न केला. काही वेळ व्यक्तीने धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद
ही सर्व घटना घडत असताना आसपासचे नागरिक, प्रवासी हे देखील थांबून काय घडतंय हे पाहत होते. अनेकांनी या घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ देखील काढला. हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं देखील दिसून आलं, या प्रकरणी वाहतूक पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. शहरातील अनेक ठिकाणी ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. प्रशासन यावर कठोर कारवाई करत असून देखील काही जण कायद्याचा धाक न बाळगता सर्रासपणे नियम मोडताना दिसतात, नागरिकांनी देखील जबाबदारीने वागणं गरजेचं आहे.