पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या हातातून फोन काढून घेतला म्हणून अल्पवयीन मुलाने आपल्या आईवर वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हातातून मोबाईल काढून घेतला, त्यामध्ये सुरू असलेली मालिका बंद केल्याने अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात आईवर कात्रीने वार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर मुलाने घरातील खिडकीच्या काचा फोडून आईला मारहाण केली. ही धक्कादायक घटना धनकवडी परिसरात घडली आहे.


या घटनेनंतर आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनकवडी भागात राहते. त्यांचा मुलगा 14 वर्षांचा असून ते आत्ता सातवीत शिकत आहे. सोमवारी फिर्यादी महिला आणि त्यांचा मुलगा मोबाईलमध्ये युट्युबवर एक मराठी मालिका पाहत होते. बराच वेळ दोघेही मालिक पाहात असल्याने फिर्यादी यांनी मुलाकडून मोबाईल हातातून घेऊन मालिका बंद केली.


हातातून मोबाईल हिसकावून घेतल्याने मुलगा आईवर चिडला. त्याने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने रागातून घरातील लाकडी फ्रेम देखील फोडली, त्याचबरोबर त्याने कात्रीने आईवर वार करण्याचा प्रयत्न केला. आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरातील खिडकीच्या काचा फोडल्या. त्यामुळे घाबरलेल्या आईने या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दोन वर्षांपासून चिडचिड 


कोरोनाकाळापासून लॉकडाऊनमध्ये मुलाची शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली. तेव्हापासून मुलगा दिवसभरात बराच वेळ मोबाईलचा वापर करत असल्याचं निदर्शनास आलं. मागील दोन वर्षांपासून त्याचा मोबाईल वापरण्याचं प्रमाण चांगलचं वाढलं होतं. त्यामुळे मुलगा जास्त वेळ मोबाईल घेऊन बसत असेल तर त्याची आई त्याच्या हातातून मोबाईल काढून घेत असायची. मोबाईल घेतल्यास तो आरडाओरडा, चिडचिड करत होता, यासोबत तो रागात आपल्या आईवर धावून जात होता. गेल्या दोन वर्षांत हे प्रकार वाढले आहेत. तो मोबाईलवर गेम खेळत, युट्युबवर रिल्स आणि व्हिडिओ पाहायचा अशी माहिती पोलिसांनी दिली.


मुलाची रवानगी निरिक्षण गृहात 


मोबाईलचा अतिवापर करण्यामुळे मुलाची चिडचिड वाढली होती. मोबाईल न दिल्यास कुटुंबीयांना त्रास देणं देखील वाढलं होतं. त्यामुळे त्याच्या वागणुकीमध्ये सुधारणा होण्यासाठी त्याचबरोबर तज्ज्ञांकडून त्याचे समुपदेशन करण्यासाठी मुलाची निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे. त्यात योग्य ती सुधारणा होईपर्यंत त्याला निरीक्षणगृहात ठेवले जाणार असल्याची माहिती आहे.