पुणे: पिंपरी चिंचवड पोलिसांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्यात, हे दोघे चोरीच्या बुलेट विक्री करायचे. त्यांचा मित्र अभय खर्डे चाकण परिसरातून बुलेट चोरून आणायचा आणि यश थुट्टेसह प्रेम देवरे हे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणारे दोघे ग्राहक शोधून द्यायचे. रवींद्र गव्हाणे आणि शुभम काळे हे उच्चशिक्षित ही या चोरीत सहभागी असायचे. खर्डेने युट्युबवर व्हिडीओ पाहून चोरीचा फंडा अवगत केला होता. ऑनलाइन कसिनो गेममध्ये पैशांचे नुकसान झाल्यानं खर्डे या मार्गाला लागला होता तर इतरांना झटपट पैसे मिळतायेत म्हणून ते याच्या आहारी गेले होते. एक-दोन नव्हे तर तब्बल अठरा बुलेट त्यांनी चोरल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून या सर्वांना अटक करण्यात आली असून हे एकमेकांचे मित्र आहेत. (Crime News)


पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बुलेट चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. एका ठिकाणी चोरी झालेल्या बुलेटच्या शोधासाठी पोलीस 150 सीसीटीव्ही फुटेज पाहत संगमनेरपर्यंत पोहचले. तिथे आरोपी अभय खर्डे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चाकण आणि आसपासच्या परिसरातून 18 दुचाकी केल्याची कबुली दिली. तसेच चोरीच्या दुचाकी विकण्यासाठी त्याला मदत करणाऱ्या चारही आरोपींना अटक केली. त्यांनी ग्रामीण परिसरात विकलेल्या चोरीच्या 18 बुलेट हस्तगत केल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अभय खर्डे याला ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद होता. यामध्ये तो पैसे हरला. हरलेले पैसे परत मिळविण्यासाठी त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला. युट्युबवर पाहून त्याने दुचाकी चोरी कशी करायची हे शिकला. बुलेटला किंमत मिळत असल्याने तो सहसा बुलेटच चोरी करीत असे. तर यश आणि प्रेम त्याला ग्राहक शोधून द्यायचे. रवींद्र आणि शुभम या तिघांना लागेल ती मदत पुरवायचे. या पाच जणांकडून २६ लाख रुपयांच्या ११ बुलेट, सहा स्पेंडर, व एक यामाहा दुचाकी हस्तगत केल्या.