पुणे : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने अवैध दारू (PUNE CRIME)  निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा (liquor) घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून गेल्या दोन महिन्यात 2 कोटी 81 लाख 91 हजार 349रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने 1 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत छापे टाकत 426 वारस गुन्ह्यांची नोंद व 411 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 20 हजार 675 लिटर गावठी हातभट्टी दारू, 761 लिटर देशी मद्य, 18 हजार 295 लिटर विदेशी मद्य, 138 लिटर बिअर व 1 हजार 823 लिटर ताडीसह 36 वाहने असा 2 कोटी 81 लाख 91 हजार 349 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 93 अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या व सराईत आरोपी विरूद्ध चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्रासाठी दाखल 442 प्रस्तावांपैकी 248 जणांचे बंधपत्र घेण्यात आले असून 97 लाख 71 हजार रुपये बंधपत्राची रक्कम घेण्यात आली आहे. बंधपत्र घेतल्यानंतर 41 प्रकरणांत नियमाचे उल्लंघन निदर्शनास आले. 


1 एप्रिल 2023 ते 31  जानेवारी 2024 या कालावधीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करून 202 गुन्हे नोंदवले. त्यामधील 468 आरोपीना अटक करुन  न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 170 आरोपींना दोषी ठरविले असून या आरोपींना 5 लाख 83 हजार 100 रूपये इतका द्रव्य दंड ठोठविला आहे. यामुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्यांसोबतच अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांनाही चाप बसणार आहे.


अवैध मद्य व्यवसायात गुंतल्याबद्दल वारंवार गुन्हे नोंदविलेले तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करुनही वर्तणुकीत बदल झाला नाही अशा आरोपीविरूद्ध एम.पी.डी.ए कायदा 1981 अंतर्गत पोलीस कारवाई करण्यात येते. यामध्ये दाखल 48 प्रकरणात पोलीस आयुक्तालयाकडून कारवाई करून 10  आरोपी विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. परवानाकक्षा नमुना एफएल-3 अनुज्ञप्तीविरुद्ध एकूण 249 नियमभंग प्रकरणे, त्यापैकी 3 निलंबन संख्या व 44 लाख 90 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 


कारवाईसाठी 14 नियमित आणि 3  विशेष पथके तयार



आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री तसेच परराज्यातील मद्य, अवैध ताडी आदींची विक्री, अवैध ढाब्यांवर मद्याची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने एकूण 14 नियमित व 3 विशेष पथके तयार केली ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. तसेच रात्रीची गस्त घालण्यात येणार आहे. राज्याचा महसूल चुकवून परराज्यातून येणाऱ्या मद्य साठ्यावर तसेच किरकोळ अनुज्ञप्तीचे व्यवहार विहीत वेळत चालू नसल्यास व काहीही आक्षेपार्ह आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.


इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News :  40 हजारात एक लाखांच्या बनावट नोटा; 500च्या दोन नोटा अन् बाकी वह्यांचं बंडल; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटांच्या छापखान्याचा भांडाफोड