पुणे: पुण्यात एकीकडे गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत, अशातच पुण्याचे माजी उपमहापौर आणि काँग्रेसचे नेते आबा बागूल (hemant bagul) यांच्या मुलाने एका तरुणाला भररस्त्यात मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शहरामध्ये ट्रॅफिकमधून दुचाकी चालवताना कारला धक्का लागला, या कारणातून आबा बागूल यांचा मुलगा हेमंत बागूल (hemant bagul) यांनी तरुणाला मारहाण केली. या घटनेनंतर तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर हेमंत बागूल (hemant bagul)  यांनीही तक्रारदार तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल


हेमंत बागूल आणि तरुणामध्ये वाद होताना आणि मारहाण होतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या संबंधित व्हिडीओमध्ये एक तरुण दोन कारच्या मधून दुचाकीवर जाताना दिसत आहेत. दरम्यान, लाल रंगाच्या कारचा दरवाजा उघडल्याने संबंधित तरुणाचा धक्का बागूल यांच्या कारला बसला. यानंतर घटनास्थळी बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. हेमंत बागूल यांनी कारमधून खाली उतरत तरुणाला कानशिलात लगावली. यानंतर भररस्त्यात तरुणाची कॉलर पकडून मारहाण केली. पुण्यातील मंगळवार पेठ परिसरात ही घटना घडली आहे.


हा सर्व घटना रस्त्यावर असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी दोघांनी एकमेकांविरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. संबंधित घटना 21 जानेवारीला घडली आहे. पण तरुणाची पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेतली जात नव्हती, असा आरोप पीडित तरुणाने केला आहे.


घटनेवर हेमंत बागुल यांची प्रतिक्रिया?


या घटनेबाबत हेमंत बागुल यांनी माहिती देताना म्हटलं की, ‘माझे वाहन सिग्नल लागल्याने थांबलेले असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करून डाव्या बाजूने ओव्हरटेक करून त्या व्यक्तीने माझ्या वाहनाला पाठीमागून धडक दिली. त्यावेळी मी त्याला जाब विचारला असता, त्याने अरेरावी केली. त्याने दादागिरी करुन शिवीगाळही केली. त्यातून हे घडलं. ज्यावेळी त्याला कळलं की मी आबा बागुल यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याने प्रसिद्धीपोटी किंवा प्रतिमा मलीन करण्यासह आर्थिक लाभापोटी हा खटाटोप केला आहे, असं हेमंत बागुल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.


हेमंत बागुल यांच्यापासून माझ्या जीवाला धोका...


दरम्यान, आबा बागुल यांचा राजकीय दबाव असल्यामुळे गुन्हा नोंद केला जात नव्हता असं तक्रारदाराचं म्हणणं आहे. हेमंत बागुल यांच्याकडून मला जिवे मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांना सांगून एनसी दाखल केला. फय्याज सय्यद असं तक्रारदारचं नाव आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हेमंत बागुल यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, त्यांनी मला गोळी मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारदार सय्यद यांनी पोलीस आयुक्तांना सांगितलं. मंगळवार पेठेमध्ये असणाऱ्या एचपी पेट्रोल पंपासमोर हा सर्व प्रकार घडलेला आहे.


सय्यद हे मालधक्का चौकातून मंगळवार पेठच्या दिशेने जात होते. त्यावेळी पेट्रोल पंपासमोर एक लाल गाडी उभा होती. गाडीतील चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने सय्यद यांची गाडी बाजूला असणाऱ्या काळ्या गोल्डस्टार गाडीवर आदळली. गाडीला डेंट गेल्याने हेमंत बागुल यांनी सय्यद यांना मारहाण केली. याबाबत बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधातही तक्रारी दाखल आहेत.