Pune News : शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना न्यायालयाने समन्स (Summon) बजावले आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दाखल केलेल्या तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याप्रकरणी (Defamation Case) हे समन्स बजावण्यात आले आहे. पुण्यातील (Pune) शिवाजीनगर न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीशांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात समन्स बजावले आहे. पुढील महिन्यात 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहून दाव्याला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अंधारे यांच्याकडून शिरसाट यांच्याविरोधात तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा
आमदार शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी पुणे पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर शिरसाट यांनी केलेल्या कथित वक्तव्याबाबत सुषमा अंधारे यांनी त्यांना मानहानीबाबत नोटीस बजावली होती. त्यामध्ये, त्यांनी सात दिवसात खुलासा करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने अंधारे यांनी शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरुपाचा दावा दाखल केला होता. दिवाणी दाव्यात त्यांनी तीन रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, असं नमूद केलं होतं. त्यानंतर आता न्यायालयाने शिरसाट यांना समन्स बजावले आहे.
संजय शिरसाट यांना छ.संभाजीनगर पोलिसांकडून दिलासा
दरम्यान काही दिवसांपूर्वीच संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून मोठा दिलासा मिळाला होता. सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध विनयभंग करणारे वक्तव्य केल्याप्रकरणाच्या आरोपाबाबत शिरसाट यांना पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली. डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आलेल्या चौकशीनंतर शिरसाट यांना ही क्लीन चीट मिळाली आहे.
संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगासह परळी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये हे वक्तव्य केल्याने बीड पोलिसांनी ही तक्रार छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडे वर्ग केली होती. त्यानंतर डीसीपी दर्जाच्या एका अधिकाऱ्याकडून या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आली. मात्र संजय शिरसाट यांनी जेव्हा वक्तव्य केलं त्यावेळी अंधारे या त्या ठिकाणी नव्हत्या. घटनास्थळी व्यक्ती नसल्याने विनयभंग होत नसल्याचा निकष पोलिसांकडून काढण्यात आला आहे. त्या प्रकरणी अंधारे यांना पत्र पाठवून पोलिसांकडून कळवण्यात देखील आलं होतं.
हेही वाचा