पुणे: पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटीस्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत. पहाटे 5.30 वाजता पुण्यातील एसटी स्टँडवरती संतापजनक घटना घडली आहे. 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती. त्या दरम्यान बस स्थानकात ही घटना घडली. गुन्हा घडल्यावर हा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जातोय. ही घटना घडली त्याआधी या तरूणीशी नराधमाने आधी चर्चा केली, आणि तिला चुकीच्या बसमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. 

तू टॉर्च लावून आतमध्ये जा...

26 वर्षाची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती, स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली. तेव्हा एका अनोळखी इसमाने तिला तिची एसटी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं. माझी एसटी याच ठिकाणी थांबते तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने त्या नराधमाला सांगितलं. मात्र, एकट्या मुलीचा फायदा घेत त्या तरुणाने तिला त्याच्या शब्दात अडकवले. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती. त्यामध्ये पाहून तिने ही एसटी तर बंद आहे, असं देखील सांगितलं. तू टॉर्च लावून आतमध्ये जा. हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल, असं या नराधमाने तिला सांगितले आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला. त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला. घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितलेला असून पोलिसांची विविध पथकं आरोपीचा शोध घेत आहेत. 

दत्तात्रय गाडे कोण आहे?

नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. चेन स्नॅचींग सारखे गुन्हे त्याच्यावरती आहेत. पोलिसांकडून या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

मित्राला फोन लावला अन्...

ही तरुणी ज्याठिकाणी बसली होती, तिच्या शेजारी आणखी एक व्यक्ती होती. आरोपी तरुणीशी बोलायला आल्यानंतर हा व्यक्ती निघून गेला. त्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीशी गोड बोलून ओळख काढली. कुठे जाते ताई? असे त्याने तरुणीला विचारले. त्यावर तरुणीने आपल्याला फलटणला जायचे असल्याचे सांगितले. त्यावर दत्तात्रय गाडे म्हणाला की, सातारची बस तिकडे लागली आहे. त्यावर तरुणी म्हणाल की, सातारची बस इकडेच लागते म्हणून मी इथे बसलेय. पण आरोपीने तरुणीला बस दुसरीकडे लागली आहे, मी तुला तिकडे घेऊन जातो, असे सांगितले. तेव्हा ही तरुणी आरोपीच्या पाठीमागे चालत गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही मुलगी बसजवळ पोहोचली तेव्हा अंधार होता. त्यामुळे तिला बसमध्ये चढायचे की नाही, हा प्रश्न पडला. त्यावर आरोपीने म्हटले की, रात्रीची बस आहे, लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहेत. तू वर चढून टॉर्चने चेक कर. त्यानंतर ही तरुणी बसच्या आतमध्ये गेली तेव्हा आरोपीने पटकन आतमध्ये जाऊन बसचा दरवाजा लावून घेतला. यानंतर आरोपीने तरुणीवर अतिप्रसंग केला. अत्याचार झाल्यानंतर आरोपी बसमधून उतरून निघून गेला. त्यानंतर मुलगीही बसमधून खाली उतरली. ती दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी जात होती, तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला आणि घडलेला प्रसंग सांगितला. मित्राने सांगितल्यावर ही तरुणी पोलीस ठाण्यात आली आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.