पुणे: माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कोमकर कुटुंबावर लक्ष्य साधत आंदेकर टोळीतील सराईतांनी गणेश कोमकरचा मुलगा आयुष याच्यावर गोळीबार केला. नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या हल्ल्यात सराईतांनी आयुषवर तब्बल ११ गोळ्या झाडल्या, त्यापैकी नऊ गोळ्या शरीरात घुसल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्राजक्ता आपटे यांनी १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. घटनेच्या दिवशी आयुष लहान भावाला शिकवणीवरून घरी घेऊन येत असताना, लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर दबा धरून बसलेल्या आंदेकर टोळीतील यश पाटील आणि अमन पठाण यांनी त्याच्यावर पिस्तुलातून बेछूट गोळीबार केला. या प्रकरणी यश सिद्धेश्वर पाटील (१९) आणि अमित प्रकाश पाटोळे (१९, रा. नाना पेठ) यांना पोलिसांनी अटक केली. आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर (३७) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, या हत्याकांडात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अटकेत असलेल्यांच्या चौकशीत आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आयुषच्या जर्किनची चाळण
ज्याप्रमाणे मागील वर्षी वनराज आंदेकरची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या केली, त्यावेळी आंदेकरच्या शरीराची गोळ्यानी चाळण केली त्याचप्रमाणे आयुषला देखील मारलं गेलं आहे, आयुषवर आरोपींनी अकरा गोळ्या झाडल्या. हल्ला झाला तेव्हा आयुषने जर्कीन घातलेलं होतं. गोळ्या लागल्याने जर्किनची चाळण झाली होती. गोळीबार करताना चौघे आरोपी होते. दोघे जण लक्ष्मी कॉम्प्लेक्स इमारतीसमोर दुचाकीवर थांबले होते. गोळीबार केल्यानंतर आरोपी 'इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर,' असे ओरडले. आरोपींनी यावेळी परिसरात दहशत पसरवली. त्यामुळे या गुन्ह्यात पोलिसांकडून दहशत माजवण्याचे कलम देखील वाढवण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तसंस्थेने दिले आहे.
पोलीस बंदोबस्तात आयुषवरती अंत्यसंस्कार
आयुष कोमकरवरती काल (सोमवारी) वैकुंठ स्मशानभूमीत कडेकोट पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. आयुषचे वडील गणेश कोमकर वनराज आंदेकर खून प्रकरणात नागपुरच्या कारागृहात आहेत. न्यायालायने गणेश कोमकरला 'पॅरोल' (संचित रजा) मंजूर केला. नागपूर कारागृहातून गणेश कोमकरला पुण्यात आणण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी वैकुंठ स्मशानाभूमीत पोलीस बंदोबस्त होता. अंत्यसंस्कारानंतर गणेश कोमकरला पोलीस बंदोबस्तात नागपूर कारागृहात रवाना करण्यात आले.
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान मागील वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा बदला या खुनाद्वारे घेण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष नाना पेठेतील एका सोसायटीत राहायला होता. शुक्रवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो क्लासवरून दुचाकीवरून आला त्यावेळी पार्किंगमध्ये त्याच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या.
बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक
आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशीरा अटक केल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाणा या ठिकाणी पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. यात बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू ही असल्याची माहिती समोर आली आहे.