पुणे: आंदेकर-कोमकर कुटुंबातील दशकानुदशके सुरू असलेले टोळी युद्ध आता रक्तरंजित वळणावर आले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्याच्या हेतूने बंडू आंदेकरच्या टोळीने थेट गणेश कोमकरचा मुलगा, फक्त 19 वर्षांचा आयुष कोमकर याची निर्दयी हत्या केली. ५ सप्टेंबरच्या रात्री आठ वाजता, लहान भावाला शिकवणीवरून घरी घेऊन येत असताना, आंदेकर टोळीतील सराईतांनी आयुषवर पिस्तुलातून ११ गोळ्या झाडल्या. त्यापैकी नऊ गोळ्या थेट शरीरात शिरल्याने आयुषचा जागीच मृत्यू झाला. गुन्हेगारी वैराने एका निष्पाप तरुणाचा बळी घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आंदेकर कुटुंब गेली पाच दशके गुन्हेगारी विश्वात दिसून येते. गेल्या वर्षी वनराज आंदेकर यांची हत्या स्वतःच्या सख्या बहिणीनेच सुपारी देऊन केली होती. आता त्या रक्तरंजित घटनाक्रमानंतर आंदेकर गटाने थेट कोमकर घराण्यातील तरुण मुलाला लक्ष्य केले.
गणेशला नागपूर कारागृहात
आयुषचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. खुनानंतर तीन दिवसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या शोकाकुल विधीसाठी त्याचा वडील गणेश कोमकरला खास परवानगी घ्यावी लागली. वनराज आंदेकर हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या गणेशला नागपूर कारागृहात शिक्षा भोगावी लागत आहे. मुलाच्या मृत्यूनंतर त्याला पॅरोलवर सोडण्यात आले आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात पुण्यात आणण्यात आले. पोलिसांनी कोणताही घातपात घडू नये म्हणून स्मशानभूमीत मोठा फौजफाटा तैनात केला होता.
एक ग्रिटींगकार्ड आणलं होतं
पोलिसांच्या गाडीतून उतरल्यानंतर गणेशचा आक्रोश दाटून आला. आपल्या पोटच्या लेकराची अशी अवस्था आणि आयुषचा मृतदेह पाहताच "माझ्या मुलाची काय चूक होती? माझ्या जागी मलाच का नाही ठार मारलं?" असा टाहो फोडत तो रडत होता. यावेळी त्याने आपल्या सोबत एक ग्रिटींगकार्ड आणलं होतं. हे ग्रिटींगकार्ड आयुषने बापाला जेलमध्ये असताना पाठवले होते. "आय लव्ह यू पप्पा" असे लिहिलेले हे कार्ड पाहताच गणेश हंबरडा फोडून रडला. या कार्डामध्ये त्याच्या मुलाचे व वडिलांचे बालपणापासूनचे फोटो चिकटवलेले होते.
काही चूक नसताना माझ्या मुलाला का मारलं?
"बाळ तुला चॉकलेट घेऊन आलोय मी…" असे म्हणत गणेशने हुंदके देत आपल्या मुलाच्या पार्थिवाला निरोप दिला. त्याच्या या आक्रोशाने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. गणेश वारंवार पोलिसांकडे पाहून विचारत होता, "काही चूक नसताना माझ्या मुलाला का मारलं? मला पण गोळ्या घाला." अंत्यसंस्कारावेळी आयुषचे कुटुंबीय, भावंडे, नातेवाईक उपस्थित होते. त्याच्या भावाने व आईनेही प्रचंड आक्रोश केला. एका गुन्हेगारी वैराचा आयुष निष्पाप बळी ठरला.
गणेश कोमकरचा एक व्हिडीओ समोर
गणेश कोमकर हा आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी वैकुंठ स्मशानभूमीत जाताना दिसतो, गाडीतून उतरला तेव्हापासून त्याच्या हातात आयुषने पाठवलेले ग्रिटिंग कार्ड होते. त्यावेळी त्याचा चेहरा रडवेला झालेला दिसतो, त्याच्यासोबत पोलिस देखील आहेत, त्याच्या हतात त्याच्या मुलाने म्हणजेच आयुषने दिलेले ग्रिटींगकार्ड आहे, तो ते ग्रिटींगकार्ड वरती हातात घेऊन दाखवतो, पुढे तो आपल्या परिवाराला आणि समोर मुलाचा मृतदेह पाहून रडू लागतो. या सगळ्यात त्याची काही चूक नव्हती. काही चूक नसताना माझ्या मुलाला शिक्षा भोगावी लागली, असे गणेश कोमकर रडत म्हणाला. यावेळी सर्व कोमकर कुटुंबीयही रडत होते. बाळ तुला चॉकलेट घेऊन आलोय मी, असं म्हणत गणेशने हंबरडा फोडला. माझी काही चूक नसताना माझ्या मुलाला का मारलं? मला पण गोळ्या घाला, असं म्हणत गणेश कोमकरने आक्रोश केला.