पुणे : पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या एटीएम स्वीच (सर्वर) वर सायबर हल्ला करत तब्बल 94 करोड 42 लाख रुपये चोरल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. 11 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला होता. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने याप्रकरणी कारवाई केली.


याप्रकरणी आणखी पाच जणांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध सुरु आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

फहिम मेहफुज शेख (वय-27) आणि फहिम अजीम खान (वय-30) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर महेश राठोड, कुणाल, अली, मोहम्मद आणि अॅन्थनी या पाच जणांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या सर्वांनी कोल्हापुरातील विविध बँकातून 95 कार्डचे क्लोन करून तब्बल 89 लाख 47 हजार 500 रुपये काढल्याचं तपासात समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अटक आरोपींना पुणे न्यायालयात हजर केलं असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

एकूण रक्कम 94 कोटी रुपयांची आहे. मात्र अटक आरोपींनी 89 लाख रुपये कोल्हापुरमधील वेगवेगळ्या एटीएममधून कार्ड क्लोन करुन काढले आहेत. बाकी पैसे कोणी आणि कसे काढले याबात सायबर सेलच्या अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे.

कॉसमॉस बँकेच्या स्विचिंग सिस्टिमची फसवणूक करुन पैसे काढण्यात आल्यानंतर हे पैसे 28 देशांमधील एटीएममधून काढले गेल्याचं आणि त्यापैकी अडीच कोटी रुपये भारतातील एटीएममधून काढल्याचं तपासात समोर आलं होतं. त्यामुळे अटक आरोपींचा कोणत्या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :
कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा, दोन तासात 94 कोटी गायब!

EXCLUSIVE पुणे | कॉसमॉस बँकेची खाती हॅक करण्यामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा हात : अध्यक्ष मिलिंद काळे

हॅकर्स बँकेवर दरोडा कसा टाकतात?