Pune Suicide : मागील काही दिवसांपासून पुण्यात आत्महत्येचं (Suicide) प्रमाण वाढत आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विकास टिंगरे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर असलेल्या त्यांच्या पतसंस्थेच्या कार्यालयातच त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अजुनही अस्पष्ट असलं तरीही सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
विकास टिंगरे हे पुणे शहरातील विश्रांतवाडी भागाचे काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष होते. त्यांनी अचानकपणे कार्यलयातच केलेल्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास टिंगरे हे मंगळवारी रोजच्या प्रमाणे धानोरी येथील पोरवाल रोडवर असलेल्या पतसंस्थेच्या कार्यालयात आले होते. विकास यांनी मंगळवारी जेवण केलं नव्हतं. त्यामुळे त्यांचे कर्मचारी त्यांना ऑफिसमध्ये बघायला गेले होते. त्याचवेळी कर्मचाऱ्यांना विकास टिंगरे यांनी गळफास घेतल्याचं दिसलं. त्यांना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टिंगरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. टिंगरे यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. विश्रांतवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. वारजे येथील स्वतःच्याच कार्यालयात त्यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली होती. संजय ज्ञानोबा बराटे असं या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव होतं. संजय बराटे यांचे वारजे एनडीए रोडवर (Warje NDA Road) घर होतं. त्याच इमारतीमध्येच त्यांचे कार्यालय होतं. बराटे आपल्या कार्यालयात होते. त्यांच्या पत्नी कार्यालयात गेल्या. तेव्हा संजय बराटे यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलं.
आत्महत्येत वाढ झाल्याचं घटनांमधून समोर
पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातील इतर शहरात आत्महत्येत वाढ झाली आहे. यासाठी सर्व क्षेत्रात सुरु असलेली स्पर्धा यासाठी कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. मात्र या आत्महत्येमागची कारणंदेखील क्षुल्लक असल्याचं आतापर्यंतच्या घटनेतून समोर आलं आहे. त्यात जर राजकीय पक्षाच्या पदाधिकारी किंवा राजकीय कार्य करत असलेल्या नेत्यानं आत्महत्या केली तर अनेक प्रश्नांना तोंड फुटतं. त्यात कोणाशी काही वादावादी झाली का? किंवा आत्महत्या नसून घातपात आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जातात. यावेळी पदाधिकाऱ्याने कार्यलयातच गळफास घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.