Pune Crime News : पुण्यात सायबर गुन्ह्यांचा धुमाकूळ काही संपायचं नाव घेत नाही आहे. राजकारण्यांच्या नावाने पैसे उकळून आणि त्यांना धमक्या देऊन झाल्यानंतर आता याबर चोरांनी पुन्हा एकदा थेट पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्याचे सत्र सुरुच असल्याचं समोर आलं आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे फोटो वापरत मागील महिन्यात "माही वर्मा" या नावाने फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते. यावेळी पुन्हा एकदा देशमुख यांचे नाव आणि वापरुन बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वी 4 ते 5 वेळा त्यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते आणि त्यांच्या मित्र परिवारातील अनेक जणांना रिक्वेस्ट सुद्धा पाठवण्यात आल्या होत्या. या संदर्भात राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख याचा फोटो वापरुन हे अकाऊंट तयार करण्यात आले आहेत. त्यावरुन अनेकांना मेसेजदेखील पाठवण्यात येत आहे. फेसबुकवर माझ्या नावाने तयार करण्यात आलेले अकाऊंट माझे नसून कुठल्या ही प्रकारच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नका, असे आवाहन स्वतः देशमुख यांनी केलं आहे.
राजकीय नेत्यांच्या नावे फसवणूक अन् धमकीचे फोन
काही दिवसांपूर्वी याच सायबर चोरांनी पुण्यातील राजकारण्यांना निशाण्यावर धरलं होतं. त्यांच्या नावाने फोन करुन अनेकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला होता. यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे आणि मनसेचे नेते वसंत मोरे यांचा समावेश होता. त्यानंतर भाजप नेते गणेश बीडकर यांना तर श्रीराम नवमीच्या मिरवणुकीमध्ये असताना त्यांना एका नंबरवरुन व्हॉट्सअॅप कॉल आला होता. त्याने हिंदी-मराठी भाषेतून बीडकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुला राजकीय मस्ती आली आहे, तेरे पास बहोत पैसे हो गया है, अब थोडा खर्चा भी कर, नाही तर तुझी बदनामी करुन तेरा पॉलिटीकल करिअर बरबाद करूंगा, तू चुपचाप 25 लाख रूपये दे, अशा शब्दांत त्यांना धमकावण्यात आलं होतं. या सगळ्यांना फोन करणारा व्यक्ती एकच असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. आवडणाऱ्या मुलीने नकार दिल्याने तिला अडकवण्यासाठी हा प्रकार करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.