Pune CNG Rate: गेल्या काही दिवसांपासून दरवाढीचा फटका सहन करणाऱ्या सीएनजी (CNG rate) वापरकर्त्यांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune-pcmc) शहरातील सीएनजीच्या दरात आजपासून (17 ऑगस्ट) 4 रुपयांनी कमी होणार आहे.सीएनजीचे वितरण करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) या कंपनीने ही कपात केली आहे. त्यामुळे आता पुण्यात सीएनजी 87 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होणार आहे, पूर्वी हा दर 91 रुपये किलो होता.


 यापूर्वी सीएनजीवरील व्हॅट 10 टक्क्यांनी कमी करण्यात आला होता, दर प्रति किलो 6.30 रुपयांनी कमी केला होता. त्यानंतर दरात सातत्याने वाढ होत होती. स्थानिक गॅसचा तुटवडा आणि महागडा आयात गॅस यामुळे सीएनजीच्या दरात गेल्या महिन्यात सहा रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहरात सीएनजीचा दर आता 85 रुपयांवरून 91 रुपये किलो झाला आहे.घरगुती नैसर्गिक वायूच्या खरेदी किमतीत घट झाल्यामुळे MNGL ने CNG ची किंमत कमी केली आहे. गॅसच्या किमती कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी MNGL ने हा निर्णय घेतला आहे.


रशिया आणि युक्रेनकडून पुरवठा होत नसल्याने सीएनजी गॅसचा तुटवडा आहे, त्यामुळे सीएनजीच्या दरांवर परिणाम होत आहे. काही वायू युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाकडून खरेदी केला जात आहे, ज्यामुळे भारतातही टंचाई निर्माण होत आहे. भविष्यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर कमी होतील, असं ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन (एआयपीडीए) तर्फे सांगण्यात आलं होतं. 



CNG दरवाढ विरोधात आंदोलन
पुण्यात रिक्षाचालकांकडून CNG दरवाढ विरोधात मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. 91 रुपये प्रतिकिलो CNG चा दर झाल्याने रिक्षाचालक हतबल झाले होते. CNG वर आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे. पुण्यातील 60 टक्के नागरिकांना रिक्षाचालक सेवा देतात. त्याच बरोबर पीएमपीएमएलला त्यांचा तोटा भरुन काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने 100 कोटी दिले. 40 टक्के प्रवासी सेवा देणाऱ्यांना या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. मात्र 60 टक्के नागरिकांना प्रवासी सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांवर दरवाढीमुळे उपासमारीची वेळ आली आहे, असं मत रिक्षाचालकांनी व्यक्त केलं होतं.


नागपूर शहरात सर्वाधिक महाग
नागपुरात सीएनजी पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग विकलं जात आहे. शहरात मोजकेच सीएनजीचे विक्रेते असून विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षाही महाग सीएनजी नागपूरात विकलं जात आहे. नागपूरमध्ये CNG चा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे.