पुणे : पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे सगळीकडेच संभ्रमाचं वातावरण आहे. पुण्यात खास पुणेरी नमुना पहायला मिळत आहे. वाहतूक पोलिसांनी पकडल्यावर वाहनचालक थेट पाचशे-हजारांच्या नोटा काढत दंड स्वीकाराच अशी हुज्जत घालत आहेत.

या नोटा चालत नाहीत, असा प्रतिवाद वाहतूक पोलिसांनी केल्यावर वाहनचालक मात्र दंड घ्याच, असा पवित्रा घेत आहेत. एरवी दंड म्हटला की पोलिसांशी हुज्जत घालणारे पुणेकर आता मात्र दंड घ्याच असं म्हणत आहेत.

पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचा परिणाम पुण्यातील हॉटेल्समधेही पहायला मिळत आहे. कार्ड पेमेंटची सुविधा असलेल्या हॉटेल्सचीच निवड पुणेकर करत आहेत. त्यामुळे अशा हॉटेल्समध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.

रुग्णालयांमध्ये नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत. काही जणांचे उपचार रखडले आहेत, तर काहींना डिस्चार्ज जाहीर होऊनही पैसा भरता येत नसल्याने रुग्णालयातुन निघता येत नाही.