मुंबई: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात ज्या रात्री पोर्शे कारच्या धडकेत (Pune Car Accident) दोघांचा मृत्यू झाला त्यावेळी गाडीतून दोन व्यक्ती उतरल्या होत्या. तो दुसरा मुलगा कोणाचा होता?, हे समोर आलं पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे या अपघातावेळी पोर्शे कारमध्ये (Porsche car) खरोखरच आणखी एका बड्या व्यक्तीचा मुलगा होता का, याविषयीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. नाना पटोले मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पुणे अपघात प्रकरणावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
ललित पाटील प्रकरणात ससून कशाप्रकारे ड्रग्ज माफियांसाठी हॉटेल बनलंय, हे समोर आलं होतं. त्यानंतर आता या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला. नागपूरमध्येही अशीच घटना घडली. नशेच्या अंमलाखाली दोन मुलींनी दोघांना उडवलं, त्यादेखील सुटल्या. जळगावमध्येह अशाच एका घटनेत आरोपी 10 तासांमध्ये सुटला. हे सर्व आरोपी श्रीमंत घरातील होते. पुण्यातील डॉ. तावरे प्रकरणात काही मंत्र्यांचीही नावं समोर येताना दिसत होते. गृहमंत्री याबाबत आता काय करणार? याची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) गेल्या वर्षभरापासून पब संस्कृतीविरोधात लढा देत आहेत. मग या घटनेनंतरच 36 पब का पाडले? अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. हेच का अजित पवारांचं कडक शासन?, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.
यावेळी नाना पटोले यांनी आगामी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीबाबतही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, कोकण पदवीधरबाबत आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. पण आघाडीचा धर्म पाळला जाईल. कोकण, नाशिक, मुंबई सगळीकडे आमचा उमेदवार तयार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
राज्य सरकारने बीडच्या घटनेची गंभीर दखल घ्यावी: नाना पटोले
बीडमध्ये घडलेली घटना ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारनं याची गंभीर दखल घेतली पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मराठा-ओबीसी वाद संपला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत मला काय उत्तर दिलं होतं ते आठवावं, असे नाना पटोले यांनी म्हटले.
आणखी वाचा
पुणे अपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट, ससूनमधला 'तो' कर्मचारी गायब, पोलीस CCTV फुटेज तपासणार