Pune bypoll :  गिरीश बापट  यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या पोटनिवडणूकीची चर्चा आता सुरु झाली.  ही जागा लढवण्यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दावे - प्रतिदावे केले जात आहेत.  काँग्रेसच्या ताब्यातील या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे पोटनिवडणुकीवर मोठं वक्तव्य केलं आहे.


जयंत पाटील म्हणाले, 'प्रशांत जगताप हे चांगले कार्यकर्ते आहेत.  त्यांना लोकसभेची निवडणूक उमेदवारी मिळावी अशी आमच्या पक्षातील अनेकांची इच्छा आहे. अर्थात जर निवडणूक होणार असेल तर प्रशांत जगताप यांना उमेदवारी मिळावी, अशी अमच्या पक्षाची मागणी आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत आम्ही चर्चा करु, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 


कसबा पाठोपाठ आता लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे वारे पुण्यात वाहायला लागले आहेत.  भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला दोन आठवडे उलटल्यानंतर उमेदवारीवरून दावे- प्रतिदावे सुरु झाले आहेत.  कॉंग्रेसच्या ताब्यातील या जागेवर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर जगतापांनी तसे कॅम्पेनिंग सुरु केलं आहे.  दोन दिवसांपूर्वी त्यांचं भावी खासदार असा उल्लेख असलेलं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. 


... मी निवडणूक लढवेन!


प्रशांत जगताप म्हणाले की, "लोकसभेच्या जागेसाठी मी इच्छुक आहे. त्यामुळे भावी खासदार म्हणून कार्यकर्त्यांनी पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. मला जर महाविकास आघाडीने आणि राष्ट्रवादीने लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी संधी दिली तर मी नक्की निवडणूक लढवेन. "उमेदवारी दिली नाही तर पक्षाच्या आदेशानुसार कॉंग्रेसच्या नेत्यासाठी काम करेन," असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


कॉंग्रेसला जागा राखणं महत्वाचं..


राष्ट्रवादीच्या या दाव्यामुळे डिवचल्या गेलेल्या काँग्रेसकडून पुण्याची जागा काँग्रेसच लढवेल हे जाहीर करण्यात आलं आहे.  पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि मावळ हे इतर तीन लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेले असताना पुणे हा एकमेव मतदारसंघ आपल्याकडं राखणं कॉंग्रेससाठी महत्वाचं बनलं आहे. या पोटनिवणुकीत काँग्रेसकडून उमेदवारीसाठी दोघांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यात अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांच्या नावाचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात एकच जागा काँग्रेस लढवत असते. बाकी लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लढवण्यात येतात त्यामुळे काँग्रेस या जागेवर आपला दावा राखून आहे.