Pune bypoll Election Hemant Rasne : पुण्यातील कसबा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपचे हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात चुरस होती. अखेर रविंद्र धंगेकरांनी विजय खेचून आणला. मात्र मागील 28 वर्ष कसबा भाजपचा बालेकिल्ला कोसळला आणि बालेकिल्ल्यातूनच हेमंत रासनेंचा पराभव झाला. त्यांच्या पराभवासाठी भाजपची अंतर्गत धूसफूस जबाबदार आहे, असं बोललं जात आहे.


Pune bypoll Election Hemant Rasne : टिळकांना उमेदवारी नाकारली?


निवडणूक जाहीर झाल्यावर टिळक कुटुंबीयांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक या दोघांपैकी उमेदवार असेल अशी दाट शक्यता होती. मात्र भाजपने ऐनवेळी हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. पोटनिवडणुकीत उमेदवारी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना दिली जाते, अशी आतापर्यंतची प्रथा आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोधदेखील होते. मात्र भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यानंतर टिळक कुटुंबीय नाराज असल्याच्या चर्चा होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. 


Pune bypoll Election Hemant Rasne : ब्राह्मणांची नाराजी...


टिळक कुटुंबीयांना उमेदवारी नाकारल्याने ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या चर्चा झाल्या त्यानंतर कसब्यात बॅनरबाजी करण्यात आली होती. त्यानंतर बाह्मणांची नाराजी समोर ठेवून हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ब्राह्मणांची नाराजी सातत्याने समोर आली. त्यामुळे याचा फटका भाजपला बसला. कसब्यात ब्राह्मणांची 13 टक्के मतदान आहे. हेमंत रासने यांचं वर्चस्व असलेल्या नवी पेठेतदेखील रासनेंना 8,498 मतं मिळाली तर धंगेकरांना 10,117 मतं मिळाली. 


Pune bypoll Election Hemant Rasne : गिरीश बापट यांनी सक्रिय सहभाग घेतला नाही पण...


त्यानंतर गिरीश बापट यांनी आजापणाचं कारण देत प्रचारातून माघार घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी पत्रक काढून यासंदर्भात महिती दिली होती. त्यानंतर कसब्यात मागील चाळीस वर्ष सत्ता गाजवलेले गिरीश बापट भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. गिरीश बापट यांनी कसबा मतदारसंघाचं पाचवेळा प्रतिनिधित्व केलंय. यावेळी गिरीश बापट हे स्नुषा स्वरदा बापट यांना उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही होते, मात्र ती मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर बापट यांनी प्रचारातून माघार घेतली असेल अशा चर्चा झाल्या.  मात्र काल पुन्हा एकदा भाजपनं नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरा बापटांची भेट घेतली आणि सकाळी बापटांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.


Pune bypoll Election Hemant Rasne : संजय काकडे प्रचारापासून लांब



भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी भाजप नेते संजय काकडे यांना निमंत्रण नसल्याची जोरदार चर्चा झाली होती. शिवाय हेमंत रासने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावर संजय काकडे यांचा फोटो नव्हता. तसेच, अर्ज भरण्याच्या वेळी भाजपकडून जो मेसेज पाठवण्यात आला होता. त्यातही त्यांचं नाव नव्हतं. त्यामुळे त्यांना डावलल्या जात आहे, अशा चर्चा होत्या. त्यांचीही मनधरणी फडणवीसांनी केली आणि त्यानंतर त्यांनी कामानिमित्त बाहेर होतो, आता प्रचार करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.