Pune Bypoll election : पुण्यात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपकडून हेमंत रासने आणि महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी आवाहन केलं होतं. मात्र महाविकास आघाडी या निवडणुकीसाठी पूर्ण तयारीने रिंगणात उतरले आहे. त्यामुळे भाजपनेदेखील निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली (pune bypoll election) आहे. या पोटनिवडणुकीसाठी थेट देशाचे गहमंत्री अमित शाहदेखील (Amit Shah) पुण्यात येणार आहे. त्याचबरोबर भाजपचे 40 स्टार प्रचारकदेखील पोटनिवडणुकीच्या प्रचारसाठी पुण्यात येणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे. केंद्र, राज्य आणि शहर पातळीवरील नेत्यांचा निवडणूक प्रचारात सहभाग करून घेण्यात आला आहे. त्यांच्यावर आता पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धुरा या सगळ्यांकडे सोपवण्यात आली आहे.
हे आहेत स्टार प्रचारक
त्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ,विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, गिरीश बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विनोद तावडे, श्रीकांत भारतीय, रवींद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, खासदार धनंजय महाडीक,आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे, विजय देशमुख, माधुरी मिसाळ, विक्रांत पाटील, विजय चौधरी, जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, इजाझ देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश जावडेकर, दिलीप कांबळे, शहराध्यक्ष महेश लांडगे, हर्षवर्धन पाटील, उमा खापरे, अमर साबळे अशा चाळीस जणांचा प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
भाजपचं टेन्शन वाढलं?
कसब्यात महाविकास आघाडीला बंडखोरी रोखण्यात यश आलं मात्र चिंचवडमध्ये बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली. कसब्यात बाळासाहेब दाभेकर, आप आणि संभाजी ब्रिगेडने उमेदवारी अर्ज मागे घेत महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ असं जाहीर केलं. यामुळे कसब्यात महाविकास आघाडीचा मार्ग सुकर झाला. मात्र ब्राह्मणांना उमेदवारी नाकारल्याने हिंदू महासंघ पोटनिवडणुकीच्या आखाड्यात उतरलं आहे. अध्यक्ष आनंद दवे हे निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढणार आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपची मतं फुटण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे परंपरागत असलेला भाजपच्या बालेकिल्ल्यात आता भाजपलाच मोठ्या तयारीने निवडणुकीच्या रिंगणार उतरावं लागणार आहे.