Pune bypoll election : पुण्यातील पोटनिवडणुकीच्या (Pune Bypoll Election) पार्श्वभूमीवर रोज नव्या घडामोडी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील मनसे नेते दीपक पायगुडे यांची राहत्या घरी भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे हे पुण्यातील पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तळ ठोकून आहेत. आज कसब्याचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी रोड शो केला. त्यानंतर त्यांनी थेट मनसे नेते दीपक पायगुडे यांची भेट घेतली. ही भेट अनेक कारणांनी महत्वाची मानली जात आहे.
मनसेनं पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र मनसेचे अनेक पदाधिकारी कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय दिसले. त्यामुळे मनसे नेत्यांनी त्यांच्या सात पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली. या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्यानंतर मनसेच्या 40 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. या कार्यकर्त्यांनी थेट धंगेकरांना पाठिंबा दिल्याचं समोर आलं.
या सगळ्यांनी पाठिंबा दिल्याने आणि राजीनामा दिल्याने मनसेत खिंडार पडले आहे. मनसेचे अनेक नेते पक्षादेश मानत आहेत. परंतु अनेक कार्यकर्ते हे मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची ही नाराजी भाजपला परवडणारी नसल्याने भाजपच्या नेत्यांकडून मनसेचं प्रत्येक मत भाजपला मिळावं, यासाठी शिंदे-फडणवीस प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच आज एकनाथ शिंदेंनी दीपक पायगुडेंची भेट घेतली
दीपक पायगुडे हे 1995 आणि 1999 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर भवानी पेठेतून विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला होता. मनसेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी लोकसभादेखील लढवली होती. मागील अनेक वर्षांपासून ते राजकारणातून अलिप्त झाले आहेत. असं असलं तरीदेखील दीपक पायगुडे यांंचं कसब्यातील काही भागात वर्चस्व कायम असल्याने एकनाथ शिंदे यांनी पायगुडेची भेट घेतली आहे.
मनसे नेते भाजपकडे अन् कार्यकर्ते धंगेकरांकडे?
कसब्याची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची आहे. या निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचं असताना मनसेनं भाजपला पाठिंबा दिला असला तरी अनेक मनसे कार्यकर्ते हे धंगेकर यांचा उघडपणे प्रचार करताना दिसत आहेत. ही बाब भाजपच्या दृष्टीने चिंतेची आहे. राज ठाकरे यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. पाठिंबा जाहीर केला असला तरी धंगेकर हे पुर्वाश्रमीचे मनसेचे नगरसेवक होते. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने राज ठाकरे यांचा आदेश नेते पाळत आहेत. मात्र कार्यकर्ते रविंद्र धंगेकरांच्या प्रचारात सामील झाले. यापूर्वीही भाजपच्या काही नेत्यांनी पुण्याच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती तरीही मनसे कार्यकर्ते धंगेकर यांचा प्रचार करताना दिसले.
पुण्यातील कसबा पेठे निवडणुकीच्या मतदानाला काही तास बाकी आहेत. त्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि दीपक पायगुडे यांची भेट महत्वाची मानली जात आहे. ही भेट जरी सदिच्छा असली तरीही ही भेट राजकीयच होती. या भेटीचा मतदानावर काही परिणाम होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.