Pune Bypolle election : चिंचवड पोटनिवडणुकीच्या (Pune Bypoll Election) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini jagtap), महाविकास आघाडीचे नाना काटे (nana kate) आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (rahul kalate) या तिघांनी धुमधडाक्यात प्रचार केला. अश्विनी जगताप यांनी पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधला. नाना काटे यांनी घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी घेतल्या तर संपूर्ण प्रचारादरम्यान कायम मतदारांच्या भेटी घेणाऱ्या राहुल कलाटे यांनी शेवटच्या दिवशी मात्र शक्तीप्रदर्शन केलं.
राहुल कलाटेंचं शक्ती प्रदर्शन
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात बंडखोर राहुल कलाटेंनी पहिल्या दिवसापासून गाठीभेटीवर भर दिला होता. मात्र शेवटच्या काही तासांत त्यांनी शक्तीप्रदर्शनावर भर दिला. सायंकाळी सहापर्यंत ते रॅली काढून मतदारांपर्यंत पोहचणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ही दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या चेहऱ्याचा प्रचारात आधार घेतला. मतदार निवडून देतील असा विश्वास त्यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे.
नाना काटेंसाठी आठ दिवस अजित पवार मैदानात
चिंचवड विधानसभेत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ही नाना काटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार मैदानात आहेत. त्यांच्या प्रमाणेच उमेदवार नाना काटे हेही घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. 2017 साली पालिकेच्या सत्ता हाती घेताना भाजपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे आता जनता माझ्या बाजूने आहे, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आहे. त्यासोबतच चिंचवड विधानसभा पुन्हा काबीज करण्यासाठी विरोधीपक्ष नेते अजित पवार प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचार सभा अथवा रॅली न काढता, त्यांनी घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर देत आहेत. स्थानिकांना भेटून ते राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. गेला आठवडाभर अजित पवार चिंचवड विधानसभेत ठाण मांडून आहेत. दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगतापांचा पराभव करण्यासाठी ते जंगजंग पछाडताना पाहायला मिळत आहे. भाजपकडून ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी टीम मतदारसंघात तैनात केलेली आहे.
जगतापांची राहिलेली कामं पूर्ण करणार; अश्विनी जगताप
चिंचवड विधानसभेतील मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांच्या हातात सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा वेळ आहे. त्यामुळं उमेदवारांनी काटेकोर नियोजन केलेलं आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीदेखील अश्विनी जगताप यांनी प्रचारयात्रा काढून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी कोणतीही कसर न सोडल्याचं दिसत आहे. अगदी शेवटच्या दिवशी त्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना सोबत घेत मतदारांच्या भेटी घेत आहेत. लक्ष्मण जगताप यांना चिंचवडकरांसाठी भरपूर कामं करायची होती. मात्र त्यांच्या आजारपणामुळे ते काही कामं करु शकले नाहीत त्यांची राहिलेली कामं पूर्ण करणार असल्याचं त्या म्हणाल्या.