Ashwini jagtap : नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगतापांनी दिवंगत (Pune Bypoll election) लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयाची धुरा आपल्या हाती घेतली आहे. आमदार होताच काही तासांच्या आत त्या कामाला लागल्या आहेत. पहिल्याच दिवशी मतदारांच्या शुभेच्छा स्विकारत, त्यांच्या समस्या ही जाणून घेतल्या. तर पक्षाचा आदेश येताच अधिवेशनात दाखल होणार आणि महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार असल्याचं त्या म्हणाल्या. 


लक्ष्मण जगताप यांच्या जागेवर मी काम करणार आहे. आज कार्यलयात आल्यावर माझं सगळ्यांनी स्वागत केलं. भाऊंच्या जागेवर मी काम करणार असल्याने सगळ्यांनाच आनंद झालेला दिसत आहे. आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसांपासून माझ्याकडे समस्या घेऊन येणाऱ्यांची रांग लागली आहे. फार दिवस अनेकांची रखडलेली कामं आहेत. ती काम आता पूर्ण करायची आहेत, असं त्या म्हणाल्या. 


सध्या अधिवेशन सुरु आहे त्यात महिलांचा मुद्दा लावून धरणार आहे. त्यात अंगणवाडीच्या महिलांना आणि मदतनिसांना वेतन वाढ हवी आहे. सर्वसामान्यांपासून सगळ्यांनाच महागाईचा फटका बसत आहे. त्यामुळे अंगणवाडीच्या महिलांचा मुद्दा आधिवेशनात मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वरिष्ठांचं अजून अधिवेशनासाठी निमंत्रण आलं नाही शपथविधी झाला आणि या अधिवेशनात संधी मिळाली की महिलांचे अनेक मुद्द्यांवर आवाज उठवणार असल्याचंही त्या म्हणाल्या. 


कोण आहेत अश्विनी जगताप?


अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत. जगताप यांच्या निधनानंतर अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. अश्विनी जगताप या पहिल्यांदाच निवडणूक लढल्या. सातारा हे त्यांचं मूळ गाव आहे. त्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची लेक आहेत. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या त्या अध्यक्षा आहेत. या प्रतिष्ठानद्वारे महिला बचत गटांचं जाळं पसरवलं आहे. लक्ष्मण जगताप निवडणुकीसाठी उभे असताना त्या प्रचारात सक्रिय असायच्या. सामाजिक कार्यात तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असतात.


जगतापांची उणीव भासत राहिल


अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झालेल्या दिवसांपासून त्या अनेकदा भावूक झाल्या होत्या. मतदानाच्यावेळी जगतापांची उणीव भासत राहिल असं त्यांनी अखेर बोलून दाखवलं होतं. दरवेळी लक्ष्मण जगताप यांना मत द्यायचे मात्र आज ते आपल्यात नाहीत. त्यामुळे मला लढावं लागत आहे. माझं मत कायम त्यांना असायचं आज मीच मला मत दिलं आहे असं म्हणत लक्ष्मण जगताप यांच्या आठवणीत त्यांचे डोळे पाणावले होते.