Pune Bypoll election : दिवंगत आमदार लक्ष्मण याच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini jagtap) यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचे लहान बंधू शंकर जगतापांनी (Shankar Jagtap) ही अर्ज दाखल केला. भाजपकडून खबरदारी म्हणून हा डमी अर्ज दाखल केलेला असू शकतो, असं बोललं जात आहे.
भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनी जगतापांचा अर्ज छाननीत बाद झाला तर ऐनवेळी कोणती अडचण निर्माण होऊ नये. म्हणून भाजपने हे पाऊल उचलले असू शकते. पण यानिमित्ताने शहरात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र शंकर जगतापांनी खबदारी म्हणून अर्ज भरुन ठेवला आहे, असं स्पष्ट केलं आहे.
ते म्हणाले की, आमदार लक्ष्मण जगताप उमेदवारी अर्ज भरत असतानादेखील मी खबरदारी म्हणून अर्ज भरत होतो. अर्जाच्या छाननीच्या वेळी अनेक अर्ज नाकारले जाऊ शकतात. त्यामुळे लक्ष्मण जगताप असा डमी अर्ज भरुन ठेवायचे. आजदेखील मी खबरदारी म्हणूनच डमी अर्ज भरून ठेवला आहे. ऐन वेळी अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यावेळी कोणतीही गफलत होऊ नये, यासाठी मी आज अर्ज भरला आहे.
अधिकृत उमेदवार अश्विनी जगताप
अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांनीही उमेदवारी अर्ज घेतले होते. त्यावेळी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. क कुटुंबीयांबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र पक्षाचा आदेश आम्हाला मान्य आहे आणि अश्विनी जगतापच भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. उमेदवारी अश्विनी जगताप यांना दिल्यावर शंकर जगताप आठ तास माध्यमांसमोर आले नव्हते त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. मी माझ्या कामासाठी बाहेर गेलो होतो, असं ते म्हणाले होते. त्यानंतर ते आज मोठ्या उत्साहाने अश्विनी जगताप यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झाले होते.
भाजपकडून मोठं शक्ती प्रदर्शन
आज अश्विनी जगताप मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल दाखल केला. यावेळी भाजपकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं. शेकडो भाजप कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. शिवाय लक्ष्मण जगतापांचे समर्थकदेखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. अश्विनी जगताप या बचतगटाचं कार्य करतात. त्यामुळे बचत गटाच्या महिलादेखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. लेकीच्या वाढदिवशी अश्विनी जगतापांनी उमेदवारी अर्ज भरुन नव्या वाटचालीची सुरुवात केली .यावेळी बोलताना ऐश्वर्या म्हणाली की, वडिलांसाठी जशी मी लकी चार्म होते तशीच आईसाठीदेखील असेल.