Pune Bypoll election :  पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. मात्र या मतदानाकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्याचं दिसलं. कसबा विधानसभा मतदार संघात पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान पार पडलं तर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी 41.1 मतदान पार पडलं. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडमध्ये तर आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणूक होत आहे. 


चिंचवडमध्ये सकाळी 7 ते 9 या वेळेत 3.52 टक्के, 9 ते 11 या वेळेत 10.45 टक्के. 11 ते 1 या वेळेत 20.68 तर 1 ते 3 या वेळेत 30.55 टक्के मतदान झाले आहे. कसबा पेठ मतदारसंघात सकाळी 7 ते 9 या वेळेत 6.5 टक्के, 9 ते 11 या वेळेत 8.25 टक्के. 11 ते 1 या  वेळेत 18.50 तर 1 ते 3 या वेळेत 30.05 टक्के मतदान झाले होते. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचे मतदान सकाळपासूनच अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळालं.


पुण्यातील अनेक नागरिकांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्याकडे कल दिसला मात्र दुपारनंतर मतदान संथ गतीने सुरु होतं. सकाळी कसबा आणि चिंचवड मतदार संघातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यात ज्येष्ठ नागरिकांचा जास्त प्रमाणात सहभाग होता. सकाळी मतदानासारखं महत्वाचं काम आटपूनच दिवसाची सुरुवात करायची, अशा भावना मतदारांनी व्यक्त केली होती.