लग्न ठरत नसल्याने पुण्यात बहीण-भावाची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 18 Oct 2018 07:56 AM (IST)
40 वर्षीय भाऊ रंजन गणपत भोपळे आणि 38 वर्षीय बहीण शैला गणपत भोपळे यांनी विषारी औषध पिऊन आपलं आयुष्य संपवलं.
पिंपरी चिंचवड : लग्न ठरत नसल्यामुळे व्यथित झालेल्या सख्ख्या बहीण-भावाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुण्यातील खेड तालुक्यामधल्या डेनेगावात ही घटना घडली. 40 वर्षीय भाऊ रंजन गणपत भोपळे आणि 38 वर्षीय बहीण शैला गणपत भोपळे यांनी विषारी औषध पिऊन आपलं आयुष्य संपवलं. भाऊ-बहीण दोघेच एकत्र राहत होते. शेजारीच राहणाऱ्या नातेवाईकांना काल संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास भोपळेंच्या घरातून विषारी औषधाचा वास आला. नातेवाईकांनी घरात डोकावल्यावर हा प्रकार समोर आला. दोघांचं वय वाढत होतं, मात्र लग्न ठरत नव्हतं. त्यामुळे दोघं नैराश्यात होते. बऱ्याचदा या विषयावर नातेवाईकांसोबत त्यांचं बोलणंही होत असे. मात्र या नैराश्यातून त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. खेड पोलिस अधिक तपास करत आहेत.