पत्र्याचं पाणी घरात पडल्याचा वाद, पुण्यात सख्ख्या भावाची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 13 Jan 2018 11:35 AM (IST)
धाकट्या भावाने मुलाच्या मदतीने लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून मोठ्या भावाची हत्या केली.
पिंपरी-चिंचवड : क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादाचं पर्यवसन हत्येत झाल्याची घटना पुण्यातील मावळमध्ये पाहायला मिळाली आहे. पडवीच्या शेडवरील पत्र्याचं पाणी घराच्या भिंतीवर पडत असल्याच्या कारणावरुन एका इसमाची सख्खा धाकटा भाऊ आणि त्याच्या मुलाने हत्या केली. मावळच्या माळवाडीमध्ये ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. कैलास केदारी आणि अमर केदारी अशी आरोपी बापलेकांची नावं आहेत. या घटनेत राजू केदारी यांना प्राण गमवावे लागले आहेत. लहान भावाच्या घरातील पडवीच्या शेडच्या पत्र्याचं पाणी मोठ्या भावाच्या घराच्या भिंतीवर पडतं. यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरु होता. शुक्रवारी रात्री हा वाद विकोपाला गेला. धाकट्या भावाने मुलाच्या मदतीने लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून मोठ्या भावाची हत्या केली. ही भांडणं घराच्या पत्र्यावर झाल्यामुळे मृतदेह देखील तिथेच पडून होता. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरु आहे.