पुणे : पुण्यातील ब्लड बँकेत जीवावर बेतणारी घटना समोर आलीय. मंगळवार पेठेतील ओम ब्लड बँकेकडून एका रुग्णासाठी चक्क एक्स्पायरी डेट उलटून गेलेलं रक्त देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
बारामतीच्या योगेश लासुरे यांची पत्नी दिपाली लासुरे यांना स्तनांचा कॅन्सर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने बी पॉझिटिव्ह रक्त देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर योगेश लासुरे हे मंगळवार पेठेतील ओम ब्लड बँकेमध्ये पोहचले आणि त्यांनी पैसे मोजून रक्ताची पिशवी खरेदी केली. ती घेऊन ते पुन्हा हॉस्पिटलला आले.
योगेश लासुरे यांनी ओम ब्लड बँकेतून आणलेल्या रक्ताच्या पिशवीवरील एक्स्पायरी डेट पाहिल आणि ते भडकलेच. कारण रक्ताच्या पिशवीवर 10 ऑक्टोबर 2018 ही एक्सपायरी डेट होती. आज 19 ऑक्टोबर 2018 ही तारीख आहे. त्यामुळे डॉक्टरांनी हे रक्त योगेश लासुरे यांच्या पत्नीला देण्यास नकार दिला.
त्यानंतर योगेश लासुरे यांनी पुन्हा ओम ब्लड बँकेशी संपर्क साधला असता, चुकीने या रक्ताच्या पिशवीवर पुढील महिन्याऐवजी या महिन्यातील 10 तारीख एक्स्पायरी डेट म्हणून टाकण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर योगेश लासुरे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे याची तक्रार केली. मात्र या विभागाने तक्रार दाखल करुनही कोणतीच कारवाई केली नाही. तर ओम ब्लड बँकेकडून क्लेरिकल मिस्टेकमुळे हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात येतोय.