पुणे : संसदेचं अधिवेशन वाया घालवल्याचा निषेध करण्यासाठी सत्ताधारी भाजपनं विरोधकांच्या विरोधात एकदिवसीय उपोषण करण्याचं ठरवलं. मात्र पुण्यात भाजपच्या दोन आमदारांनी अवघ्या अडीच तासात आपला 'उपास' सोडला.


सँडविच आणि वेफर्स खाऊन भाजपच्या पुण्यातील दोन आमदारांनी उपोषणाला तिलांजली दिली. आमदार बाळा भेगडे आणि भीमराव तापकीर यांनी आपल्याच पक्षाच्या उपोषणाला हरताळ फासला

भेगडे आणि तापकीर सकाळी 11 वाजता एकदिवसीय उपोषणात सहभागी झाले. मात्र काही वेळातच ते काऊन्सिल हॉलला गेले. तिथे पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम आणि जलयुक्त शिवार योजनेसंबंधी बैठक होती.

बैठक सुरु होताच नेहमीप्रमाणे नाश्त्याच्या प्लेट्स आल्या. मात्र स्वपक्षाच्या उपोषणाचा बहुतेक विसर पडल्याने भेकडे आणि तापकीर या दोन आमदारांनी सँडविच, वेफर्स आणि बर्फीवर ताव मारला.

पाहा व्हिडिओ :



काँग्रेसने केलेल्या सांकेतिक उपोषणावर भाजपने टीकेची झोड उठवली होती. छोले-भटुरे खाऊन काँग्रेस नेते उपोषणाला बसल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे स्वपक्षाच्या आमदारांनीही असंच उपोषण मोडल्यामुळे भाजप काय उत्त देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील आपल्या कार्यालयात, तर भाजपाध्यक्ष अमित शहा कर्नाटकातील हुबळीत उपोषणाला बसले. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत तर इतर राज्यातील भाजप नेतेही उपोषणाला बसले होते. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे आत्मक्लेष उपोषण करण्यात येणार आहे.

अधिवेशन वाया

पाच मार्चला सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र चर्चेविनाच संपलं. यासाठी विरोधक आणि सरकारने एकमेकांकडे बोट दाखवलं.

बँक घोटाळ्यावरुन काँग्रेसने पहिले पाच दिवस कामकाज होऊ दिलं नाही, तर त्यानंतर वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत, सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. या व्यतिरिक्त काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीएमनेही कामकाज ठप्प केलं होतं.
संबंधित बातम्या :

शिवसेनेचा दुटप्पीपणा : ‘सामना’तून टीका, दिल्लीत गितेंचं उपोषण