पुणे : पुणे आणि पाट्या यांचं नातं बेजोड आहे. कधी या पाट्या कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त अपमान करणाऱ्या असतात, तर कधी एखाद्याच्या घराचा पत्ता सांगणाऱ्या. पुण्यातील नगरसेविकेने अशाच 'दिशादर्शक' पाट्या लावून स्थानिकांना हैराण केलं आहे.
एखाद्या नगरसेवकाने स्वतःच्या घराचा रस्ता दाखवण्यासाठी किती पाट्या लावाव्यात, यासंबंधी महापालिकेचे कुठलेही ठोस धोरण नाही. याचाच गैरफायदा घेत पुण्यातील नगरसेवकांनी आपल्या घराच्या आसपास अनेक पाट्या लावल्याचं दिसून येत आहे.
भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी सिंहगड रस्त्यावर असलेल्या आपल्या घराचा आणि कार्यालयाचा रस्ता दर्शवण्यासाठी तब्बल अकरा ते बारा पाट्या लावल्या आहेत. या पाट्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण तर होतच आहे, शिवाय पादचाऱ्यांनाही चालणं अवघड झालं आहे.
पुणे शहरात तब्बल 164 नगरसेवक आहेत. जर प्रत्येक नगरसेवकाने अशाप्रकारे पाट्या लावायचं ठरवलं, तर शहरात पाट्यांची किती गर्दी होईल आणि नागरिकांची कशी गैरसोय होईल, याची कल्पनाही न केलेली बरी.
विशेष म्हणजे इतर नगरसेवकांच्या नावाच्या पाट्या निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या आहेत. परंतु मनिषा नागपुरे यांचा आवडता रंग भगवा असल्याने त्यांच्या नावाच्या पाट्या चक्क भगव्या रंगाच्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांमधून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
या पाट्या आपल्या निधीतूनच लावण्यात आल्याचं मंजुषा नागपुरे यांनी मान्य केलं, तरीसुद्धा इतक्या मोठया संख्येने पाट्या लावणं चुकीचं असल्याचं सांगत आपल्या नकळत पाट्या लावल्याचा दावा केला आहे.
पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पत्त्याच्या डझनभर पाट्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Apr 2018 08:23 PM (IST)
पुण्यात भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी सिंहगड रस्त्यावर असलेल्या आपल्या घराचा आणि कार्यालयाचा रस्ता दर्शवण्यासाठी तब्बल अकरा ते बारा पाट्या लावल्या आहेत
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -