पुणे : भारती विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्य एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने पेटवून घेत स्वत:ला संपवल्याची (Pune Student Suicide) धक्कादायक घटना घडली आहे. वसतीगृहातील कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीला तसेच आपल्या रुममेटच्या त्रासाला कंटाळून तिनं हे टोकाचं पाऊल उचचलल्याचं म्हटलं जातंय. 7 मार्च रोजी हा प्रकार घडला होता. त्यानंतर या विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
कर्मचारी, विद्यार्थिनीविरोधात गुन्हा दाखल
विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत मात्र महाविद्यालय प्रशासनाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मिळालेल्या रेणुका बालाजी साळुंखे (वय 19) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींचे नाव आहे. या विद्यार्थिनीच्या कथित आत्महत्येप्रकरणी वसतीगृहाच्या उपहारगृहात काम करणारा कर्मचारी सतीश जाधव आणि वसतीगृहातचराहणारी मुस्कान महेंद्रसिंग सिद्धू (वय 19) या विद्यार्थिनीविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी धोंडीबा साळुंखे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
दाखल तक्रारीनुसार मृत विद्यार्थिनी ही बालाजी साळुंखे यांची मुलगी आहे. ती भारतीय विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहत होती. याच वसतीगृहात काम करणारा सतिश जाधव नावाचा कर्मचारी रेणुकाला 'आय लव्ह यू' म्हणजेच माझे तुझ्यावर प्रेम आहे, अशा प्रकारचे मेसेज सतत पाठवायचा. मृत विद्यार्थिनी समोर दिसताच 'तू इतकी बिझी झालीस का? मी किती मेसेज केले,' असे म्हणत सतिश तिला त्रास द्यायचा. या प्रकारामुळे रेणूका घाबरली होती. यासह तिच्या खोलीत राहणारी मुस्कान सिद्धू नावाची मुलगीही तिला अभ्यास करू देत नव्हती. ती सतत खोलीचे लाईट्स बंद करायची.
स्वच्छतागृहात स्वत:ला पेटवून घेतलं
या दोघांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून रेणुकाने अखेर वसतीगृहातील स्वच्छतागृहात ७ मार्चच्या रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास स्वतःला पेटवून घेतले होते. पुण्यातीलच सूर्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार चालू होते. उपचार चालू असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास चालू आहे.