पुणे: पुणे शहरात पब आणि बारमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुणेकरांनी एका व्यासपीठावर एकत्र येऊन ठोसपणे काहीतरी केले पाहिजे, अशी गरज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात पबमध्ये (Pubs in Pune) खुलेआम ड्रग्ज सेवन करणाऱ्या तरुणांचे व्हीडिओ समोर आले होते. यानंतर पुण्यात बोकाळलेल्या पब आणि बार (bars in Pune) संस्कृतीविरोधात टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील बार आण पब संस्कृतीला आळा घालण्यासाठी ठोस उपाय करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, पुणे हे जगातील व्यवसनामुळे पूर्ण वाया गेलेल्या शहरातील एक शहर झालं की काय, अशी प्रतिमा निर्माण करणे आपण बंद केले पाहिजे. प्रशासनाने त्यासाठी तात्पुरती कारवाई न करता सातत्याने कठोर कारवाई करत राहिले पाहिजे. यादृष्टीने दक्षता पथकात सामान्य नागरिकांना सहभागी करुन घेतले पाहिजे. सगळ्या पुण्याने मिळून तीन किंवा सात दिवस दिवस पब आणि बिअर बार बंद करु, असे ठरवले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
रात्री 11 वाजता झोपावे हा शरीरशास्त्राचा नियम: चंद्रकांत पाटील
बार आणि पबमुळे निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी सगळ्या पुणेकरांनी एका व्यासपीठावर एकत्र येऊन नियमावली तयार केली पाहिजे. अरे तुम्ही पब आणि बार किती वाजेपर्यंत चालू ठेवणार? शरीरशास्त्राचा नियम आहे की, रात्री 11 ला झोपले पाहिजे. मग यांच्याबाबत तुम्ही रात्रभर दारु पिण्याची आणि अमली पदार्थ सेवन करण्याची परवानगी दिली काय? पब आणि बार चालू असताना नियमांची अंमलबजावणी करण्यात मर्यादा येतात. त्यामुळे सात दिवस क्लिअर ड्राय, त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन नियमावली तयार करु, त्याच्या अंमलबजावणीचा प्रयत्न सर्वांनी करु. आमचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग जो आहे, त्यामध्ये अत्यंत गांभीर्याने या सगळ्याकडे पाहिले जात आहे. प्रत्येक महाविद्यालयात एक अतिरिक्त जागा निर्माण करता येईल का, याचा विचार आम्ही करत आहोत. जेणेकरुन या पदावरील व्यक्तीकडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाईल. व्यसनाकडे वळण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला कोणाशी तरी बोलायचे असते. एकदा व्यक्ती व्यसनाधीन झाला की फायदा नसतो. त्यामुळे महाविद्यालयात समुपदेशकाची नवी पोस्ट निर्माण करण्याचा विचार आम्ही करत आहोत. त्यादृष्टीने येत्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही करु, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
आणखी वाचा