Pune Bandh :  पुण्यात आज पुकारण्यात आलेल्या बंदला लोकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. दुपारपर्यंत पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari), भाजपचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रसाद लाड (Prasad Lad) आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इतर नेत्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस तसेच विविध संघटनांच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता.


पुण्यातील आजच्या या बंदला (pune bandh)  व्यापारी संघटना, आडते व्यापारी वगैरेंनी या बंदला पाठिंबा दिला होता. पण भाजप आणि मनसे या बंदमध्ये सहभागी झाले नाहीत. 


खासदार छत्रपती उदयनराजे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, दीपक मानकर, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, मोहन जोशी, आमदार सुनिल टिंगरे, माजी आमदार दिप्ती चवधरी, संगीत तिवारी, अंकुश काकडे, रुपाली पाटील, अजित दरेकर, संजय बालगुडे, संतोष शिंदे, राजेंद्र कुंजिर, विकास पासलकर चंद्रकांत मोकाट हे नेते मूकमोर्चात सहभागी झाले होते.


आज सकाळी 11 वाजता खासदार उदयनराजे यांच्या हस्ते डेक्कन जिमखाना येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूकमोर्चास प्रारंभ झाला. डेक्कन जिमखाना, टिळक चौक मार्गे लक्ष्मी रस्त्याने शगूण चौक, नगरकर तालिम चौक, बेलबाग चौक मार्गे लालमहालजवळ आली. लाल महालासमोरील जिजामाता चौकात मूकमोर्चाची सांगता झाली. यावेळी उदयनराजे भोसले आणि सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. 


शहरात शुकशुकाट
दुपारी 3 वाजेपर्यंत शहरात कडेकोट बंद पाळण्यात आला होता. शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळाला. लक्ष्मी रोड, फर्ग्यूसन रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, जंगली महाराज रोडवर शुकशुकाट बघायला मिळाला. मात्र वडगावशेरी, बिबवेवाडी, चंदन नगर, कल्याणी नगर परिसरात संमिश्र प्रसिसाद बघायला मिळाला.


भाजप, मनसेचा पाठिंबा नाही
या बंदला भाजप आणि मनसे वगळता सर्व पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात असूनही त्यांनी मोर्चात सहभाग नोंदवला नाही. त्यासोबतच बाकी पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांनीदेखील मोर्चाकडे पाठ फिरवल्याचं चित्र होतं.


बंदला प्रतिसाद?
मार्केट यार्ड बंद राहणार असल्याने भाजीपाला आणि फुलांचे मार्केट बंद ठेवण्यात आलं होतं. विविध व्यापारी संघटनांनी पाठिंबा दिल्याने लक्ष्मी रस्त्यासह शहरातील सर्व दुकाने तीन वाजेपर्यंत बंद होती. गणेशोत्सव मंडळांनी पाठिंबा दिल्याने प्रमुख गणेश मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. शाळांना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे नुमवी शाळा बंद ठेवण्यात आली होती. त्यासोबतच पुण्यातील इतर शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. काही प्रमाणात पीएमपीएमएल बससेवा बंद ठेवण्यात आली होती. रिक्षा संघटनांनी पाठिंबा दिल्याने रिक्षा बंद होते. हॉटेल्स बंद ठेवण्यात आले होते.