Pune News : राज्यात मागील काही दिवसांपासून (Pune News ) अवकाळी (Unseasonal Rain) पावसानं थैमान घातलं आहे. पुणे जिल्ह्यातही मागील काही दिवस अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील पोहचले होते. ते ज्यावेळी पाहणी करण्यासाठी पोहचले त्यावेळी वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी त्यांनी कसलीही तमा न बाळगता मोबाईलच्या उजेडात शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील गावांना शनिवारी सायंकाळी गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला. गारांच्या माऱ्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचं सर्व पीक आडवं झालं आहे. शेतात गारांचा खच पडला होता. काही वेळातच सुपारी आणि लिंबाच्या आकाराएवढ्या मोठ्या गारा पडू लागल्या. गारांचा खच तयार झाला. पोंदेवाडी, खडकवाडी, जारकरवाडी, वाळुंजनगर, रोडेवाडीफाटा, बढेकरमळा, द्रोणागिरीमळा, लाखणगाव, ज्ञानेश्वरवस्ती या परिसरात गारांमुळे कांद्याच्या पिकांचे शेंडे मोडून पडले कांदा पिकांचे त्याचबरोबर मिरची, कलिंगड, फ्लावर, काकडी, भुईमुग, गहू या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांना दिला धीर
अवकाळी पाऊस आणि गारांचा मोठा पडलेला खच पाहून शेतकरी हवालदिल झाले होते. या सगळ्या परिस्थितीत धीर देण्यासाठी विवेक वळसे पाटील गेले होते. त्यांनी या सगळ्या शेतकऱ्य़ांना धीर देण्याचं काम केलं. त्यासोबतच लवकरात लवकर पंचनामा करु, असं आश्वासनदेखील त्यांनी दिलं.
पिकाचं आणि फळांचं मोठं नुकसान
या सगळ्या गारपिटीत कांद्याच्या पिकांचे शेंडे मोडून पडले, कांदा पिकांचे त्याचबरोबर मिरची, कलिंगड, फ्लावर, काकडी, भुईमुग, गहू या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे.
बारामती तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
बारामती तालुक्यातील बहुसंख्य ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. बारामतीसाह इंदापूर, दौंड तालुक्यात काही ठिकाणी पाऊस सुरु होता. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढण्यास आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी पिकाचे नुकसान झालं आहे. दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच पिंपरी चिंचवड, सातारा, धुळे, वर्धा या जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.