पुणे विमानतळावर वडापाव आणि दहा रुपयात चहा
एबीपी माझा वेब टीम | 10 Sep 2018 03:23 PM (IST)
पुणे विमानतळावर वडापावची किंमत 30 रुपयांच्या आत ठेवण्याचा प्रयत्न असेल, तर चहा-कॉफीची तल्लफही अल्प किमतीत भागणार आहे.
पुणे : 'पुणे तिथे काय उणे' असं गमतीने किंवा उपहासाने म्हटलं जात असलं, तरी अनेक गोष्टी फक्त पुण्यात घडतानाच दिसतात. विमानतळ म्हटलं की तिथे सामान्य पदार्थही महागच मिळणार, हे आपण गृहित धरलं असतं. मात्र लवकरच पुण्यात स्वस्त दरात वडापाव, चहा-कॉफी मिळणार आहे. पुणे विमानतळाचा लवकरच विस्तार होणार आहे. पुण्यातील स्थानिक पदार्थ विमानतळावर स्वस्त दरात विकले जावेत, यासाठी शोधाशोध सुरु आहे. लवकरच मराठमोळ्या वडापावची चव तुम्हाला पुणे एअरपोर्टवर चाखायला मिळणार आहे. विशेष म्हणजे इतर ठिकाणी वडापाव खाण्यासाठी शंभराची नोट मोडावी लागते, मात्र इथे वडापावची किंमत 30 रुपयांच्या आत ठेवण्याचा प्रयत्न असेल. वडापावसोबतच तुमची चहा पिण्याची तल्लफही अल्प किमतीत भागणार आहे. चहा, कॉफी आणि पिण्याचं पाणी अवघ्या दहा रुपयात उपलब्ध करण्यात येणार आहे. यापूर्वी विमानाची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांना भूक लागल्यास महागडे पदार्थ घेण्यावाचून पर्याय नव्हता. परंतु दोनच महिन्यात स्वस्त दरात खाद्यपदार्थ मिळणार आहेत. वारंवार विमानाने प्रवास करणाऱ्यांनी ही मागणी लावून धरली होती. त्यानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सूचना दिल्या असून ऑनलाईन प्रवेशिका मागवण्यात येत आहेत.