पुणे : पुण्यात आरोपीला न्यायालयात नेताना मद्यपान करु देणाऱ्या एका पोलिस उपनिरिक्षकासह 6 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. आरोपी कृष्णराव मारणेने पोलिसांना मॅनेज करुन दारु ढोसली.


कुख्यात गुंड गजानन मारणे याचा 'उजवा हात' असलेल्या कृष्णराव मारणे याला येरवडा कारागृहातून पनवेलच्या न्यायालयात नेताना आणि आणताना मद्यपान करु दिलं होतं. तुरुंग प्रशासनाच्या सतर्कतेमुळे ब्रेथ अॅनलायझर तपासणीत आरोपीनं मद्यपान केल्याचं समोर आलं.

31 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता येरवडा मध्यवर्ती कारागृहातून त्याला बाहेर काढलं आणि ते पनवेलच्या दिशेने रवाना झाले. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर आणि कारागृहात परत येताना मारणेने मद्यपान केल्याचं वैद्यकीय तपासणीत उघड झालं.

अप्पर पोलिस आयुक्त साहेबराव पाटील यांनी मुंढवा पोलिस ठाण्यातील फौजदारासह सहा पोलिसांना निलंबित केलं. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे अहवाल पाठवण्यात आला असून पैशांसाठी पोलिस आरोपीला दारु देत असल्याचं समोर आलं आहे.