पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका धनाढ्य व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्शे कारने दोघांना चिरडल्यानंतर (Pune Car Accident) त्याला वाचवण्यासाठी संपूर्ण  यंत्रणाच कशी कामाला लागली होती, याचा ढळढळीत पुरावा समोर आला आहे. प्रथम येरवाडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांच्या मुलाला कशाप्रकारे वाचवता येईल, यासाठी प्रयत्न केले. आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला तातडीने रक्ताची चाचणी करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले नाही. तब्बल नऊ तासांनी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी धनिकपुत्राने मद्यप्राशन केले आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, त्यानंतर घडलेला चक्रावणारा आणि धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. 


ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोन वरिष्ठ डॉक्टरांनी मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचे उघड झाले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून हा संपूर्ण गैरप्रकार समोर आला. या दोघांना आता सोमवारी दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाईल. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे संपूर्ण यंत्रणेची नाचक्की झाली आहे.


ससून रुग्णालयात नेमकं काय घडलं?


अल्पवयीन मुलाला रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशांचे आमिष दाखविले. डॉक्टर अजय तावरे हे ससून रुग्णालयाच्या Forensic Medicine And Toxicology विभागाचे प्रमुख आहेत. तर डॉक्टर श्रीहरी हरलोल हे अपघात विभागात चीफ मेडिकल ऑफिसर आहेत. श्रीहरी हरलोल यांच्या विभागाने अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेतले.


मात्र, त्यामध्ये मद्याचा अंश सापडू शकतो, हे लक्षात आल्यावर दोन्ही डॉक्टरांनी धनिकपुत्राच्या रक्ताचे सॅम्पलच बदलायचे ठरवले. त्यासाठी रजेवर असलेल्या डॉक्टर अजय तावरे यांनी हस्तक्षेप केला. डॉक्टर अजय तावरे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. मात्र, तरीही तावरे यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धनिकपुत्राच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल करायला सांगितली. या अल्पवयीन मुलाच्याऐवजी दुसऱ्याच एका रुग्णाचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुढे करण्यात आले. मात्र, पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणखी एका लॅबमध्ये पाठवून DNA टेस्ट करायचं ठरवलं आणि डॉक्टरांचं बिंग फुटले.


आणखी वाचा


कुलदीपकाला वाचवायला अग्रवाल बाप-बेट्यानं ड्रायव्हरला खोलीत डांबलं, पण बायकोच्या आरडाओरड्यामुळे अग्रवालांच्या तावडीतून सुटला