Pune Accident News :   परिसरातील भरधाव (Pune Accident ) गाड्यांमुळे अनेक अपघात झालेले आपण पाहिले आहेत. अपघातानंतर रुग्णवाहिकेमुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. मात्र याच रुग्णवाहिका चालकाच्या हलगर्जीपणामुळे एका नाहक जीवाचा बळी गेला आहे. जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील बसस्थानकाच्या परिसरात डुंबरवाडी  येथील टोलनाक्यावर रुग्णवाहिका पाठीमागे घेत असताना रुग्णवाहिका चालकाने एका ज्येष्ठ व्यक्तीला रुग्णवाहिकेखाली चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर त्याला त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. रज्जाक मुंढे असे मृत्यू झालेल्या जखमी व्यक्तीचे नाव आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, ओतूर येथील  बसस्थानकात हा प्रवासी उभा होता. त्याचवेळी  रुग्णवाहिका पार्किंगमधून बाहेर पडत असताना रुग्णवाहिका चालकाने उभ्या असलेल्या प्रवाशाला अक्षरक्षः दोन वेळा चिरडलं आहे. अपघातानंतर त्याच रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून उपचारादरम्यान संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्ती रुग्णवाहिका चालकाला दिसली नाही का? किंवा त्याने गाडी मागे घेताना कुठलीही काळजी घेतली नसल्याचे या घटनेवरून समोर येत आहे. यात मात्र एका व्यक्तीला नाहक आपला जीव गमावावा लागला असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास करण्याचे काम सुरु आहे. रुग्णवाहिका ही नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी असते मात्र एका रुग्ण वाहिकेमुळे नागरिकाचा जीव गेला आहे. त्यामुळे रुग्ण वाहिका चालकांवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.


भरधाव वेगाने गाडी चालकांवर कारवाई...


पुण्यात अनेक परिसरात बेफाम गाड्या चालवत असणाऱ्या तरुणांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे त्यांनी मनमानी थांबवण्यासाठी नागरिकांकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र त्यांच्या या मनामानीमुळे अनेक नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या सगळ्या तरुणांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्याप्रमाणे या बेफाम वाहन चालकांवर सीसीटीव्ही तपासून पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आता हीच घटना रुग्णवाहिकेच्या चालकाकडून घडल्यामुळे चालकावर कारवाईची मागणी केली जात आहे.