Pune Accident : बंगळुरु-मुंबई महामार्गावरील (Mumbai Bangalore Highway) दरी पुलाजवळ मध्यरात्री पुन्हा एकदा अपघात झाला. साताऱ्याहून (Pune) पुण्याकडे येणारा (Pune Accident ) ट्रेलर दरी पुलाजवळ उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात चालक जखमी होऊन केबिनच्या सीटवर अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची सुखरुप सुटका केली. वेळेवर अग्निशमन दलाच्या जवानांनी हजेरी लावल्याने चालकाचा जीव वाचला आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांचं सर्वत्र कौतुक होत आहे. 


नेमकं काय घडलं?
साताऱ्याहून पुण्याकडे येणारा ट्रेलर मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास उलटला होता. त्यावेळी ट्रेलरचा चालक जखमी अवस्थेत अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत चालकाशी संपर्क साधून त्याला धीर देण्याचा आणि न घाबरण्याचा सल्ला दिला. त्यानंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करत जवानांनी चालकाला 15 मिनिटांत बाहेर काढलं. चालकाला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चालकाची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. 


दुचाकीस्वार वाचवायला गेला अन्...
रात्री तीन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. त्या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या एका दुचाकीस्वाराने हा अपघात पाहिला त्याने मदतीसाठी प्रयत्न केला मात्र काहीच क्षणात ट्रेलरने पेट घेतला. हे पाहून दुचाकीस्वार घाबरला आणि त्याने दरी पुलावरुन उडी मारली. काही वेळाने पुलाखालून आवाज आल्यानेच जवानांच्या लक्षात आलं. त्यानंतर जवानांनी दुचाकीस्वाराची सुटका केली. या अपघातामुळे ट्रेलरमधील तेल रस्त्यावर पडल्याने इतर वाहने घसरुन पडण्याची शक्यता असल्याने जवानांनी त्या ठिकाणी माती टाकून धोका दूर केला.


अग्निशमन दलाचे जवान कायम तत्पर
पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीत अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांना जीवनदान दिलं होतं. त्यांच्या सतर्कतेमुळे दोघांचा जीव वाचला होता. 18 नोव्हेंबरला पहाटे साडे चारच्या सुमारास पौड रोडवरील आनंदनगर परिसरातील प्रभा को-ऑप सोसायटीला आग लागल्याची माहिती मिळताच कोथरुड अग्निशमन केंद्राचे अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. घटनास्थळी पोहोचल्यावर दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने प्रभा को-ऑप सोसायटीतील तीन मजली इमारतीच्या खिडकीतून ज्वाळा येत असल्याचे ब्रिगेडच्या लक्षात आले. त्याचवेळी जळत्या घरात दोन जण अडकल्याची माहिती मिळताच जवान नळीच्या पाईपच्या साहाय्याने वर गेले आणि एका बाजूला पाणी टाकू लागले. अडकलेल्या दोन विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढून सुरक्षित स्थळी आणण्यात आलं होतं त्यावेळी देखील या मुलांच्या पालकांनी आभार मानले होते.