पिंपरी चिंचवड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने 25 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. निगडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हा तरुण पुण्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका खाजगी रुग्णालयात फोन करून त्याने 25 लाखांची खंडणी मागितली होती. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून बोलतोय असं ही तो म्हणाला होता. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ही रक्कम द्यावी अशी मागणी त्याने केली होती.


खासगी रुग्णालयाला 18 जुलै रोजी हा फोन आला होता. फोन येताच रुग्णालय प्रशासनाने चंद्रकांत पाटील यांना संपर्क साधला असता त्यांच्या नावाचा अज्ञातांनी वापर केल्याचा समोर आलं होतं. "मी कोणत्याही पैशांची मागणी केलेली नाही. तुम्ही संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करा, अशी सूचना चंद्रकांत पाटील केली. त्यानंतर निगडी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता त्याला अटक करण्यात आली असून, त्याची कसून चौकशी सुरु आहे. तो कोणासाठी काम करतोय? हे तपासात समोर येईल.


आरोपीने ज्या मोबाईलवरुन हा फोन केला होता, तो देखील चोरीचा असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. ज्या व्यक्तीचा हा मोबाईल होता, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर फोन करणाऱ्याने चोरीच्या मोबाईलचा वापर केल्याचं समोर आलं. पण मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार मालकाने न दिल्याने, त्याला निगडी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.


चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
या प्रकरणी चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, "कोरोना महामारीचा सामना करताना, काहीजण याचा गैरफायदा घेत आहेत. पिंपरी-चिंचवड आणि कोथरुडमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला. माझ्या नावाचा गैरवापर करुन खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला. याविरोधात आमदार महेश लांडगे आणि आ. लक्ष्मण जगताप यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.‌ तर कोथरुड स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी स्वत: पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. तसंच, असे प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना करावी, अशी सूचनाही केली आहे."