पुणे: गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असताना आता पुणे पोलिसांनीही मोठी तयारी सुरू केली आहे, गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर भाविक मोठमोठ्या शहरात येत असताता, यावेळी अनेकदा सोने, पाकिटे, वस्तू अशा अनेक गोष्टींच्या चोऱ्या होत असतात, या काळात कोणतेही गुन्हे घडू नयेत त्यावर आळा बसावा या कारणास्तव आता शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. शहरात दीड हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर गुन्हे करणाऱ्यांवर राहणार आहे. याबबात गणेश मंडळांनाही (Pune Ganesh Manda) सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस आयुक्त कार्यालय,अतिरिक्त आयुक्त कार्यालय आणि वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही (CCTV) नियंत्रण कक्षातून संशयितांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे.
भाविकांसाठी मदत केंद्रे शहराच्या मध्यवर्ती भागात भाविकांसाठी पोलिस मदत केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, काही प्रमुख चौकांमध्ये मनोऱ्यावरून गर्दीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या बाहेरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना निश्चित होऊन शहरातील गर्दीत फिरता येणार आहे.
कॅमेऱ्यांसोबतच सात हजार पोलिस कर्मचारी देखील असणार तैनात
पुण्यात गणेशोत्सव काळात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. सात हजार पोलिसांचा (Pune Police) चोख बंदोबस्त गर्दीच्या ठिकाणी आणि शहरातील महत्त्वाच्या भागात तैनात असणार आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत अनुचित घटना घडू नयेत यासाठी पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.सुमारे सात हजार पोलिस कर्मचारी या काळात तैनात करण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाला (Pune Ganesh Chaturthi 2024) शनिवारपासून सुरूवात होणार आहे. या कालावधीत संभाव्य दहशतवादी कारवाया आणि अनुचित घटना टाळण्यासाठी शहर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवात शहरात राज्याच्या विविध भागातून आणि परदेशातील नागरिक दर्शनासाठी येतात. चोरट्यांकडून दरवर्षी गर्दीत भाविकांचे मोबाईल, दागिने चोरीच्या घटना घडतात. अशा घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.
गणेशोत्सव काळातील शहराच्या मध्यवर्ती भागात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. भाविकांकडील मोबाइल चोरी, दागिने चोरी, तसेच अनुचित प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस बंदोबस्त तैनात केले जाणार आहेत. त्यामुळे गर्दीवर शहरातील 1800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
महिलांच्या सुरक्षेला देणार प्राधान्य
या काळात महिला भाविकांजवळ असलेले दागिने, मोबाइल, पैसे चोरीला जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. चोरट्यांना रोखण्यासाठी मध्यभागात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. महिलांची छेड काढणाऱ्यांना पकडून त्यांचे फोटो चौकात लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांची धिंड काढण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.