मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठा फटका बसला असून विधानसभेत तो फटका बसू नये यासाठी भाजपकडून खबरदारी घेतली जात आहे. मराठा समाजाला आरक्षण भाजपनेच दिलं, पण तरीही मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावरुन लोकसभेला आपल्याला नाकारलं, कारण विरोधकांनी फेक नेरेटीव्ह पसरवल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते वारंवार सांगतात. आता, विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा फेक नेरेटीव्ही खोडून काढायचं मोठं आव्हान असल्याचा मंत्र कार्यकर्त्यांना देत विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागण्याचे सांगितले जाते. आता, भाजप आमदार पंकजा मुंडे यांनीही पुण्यातील मेळाव्यातून कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. यावेळी, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन फेक नेरेटीव्ह पसरवणाऱ्या राष्ट्रवादीला तुम्ही सवाल विचारा, तुमची भूमिका काय, असा प्रश्न विचारण्याचे पंकजा यांनी म्हटले. तसेच, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, हा सूर्य हा जयद्रथ असल्याचेही पंकजा यांनी म्हटले. 


आता आरक्षणाच्या (Reservation) बाबतीतील फेक नेरेटीव्ह चालणार नाही, आता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, हा सूर्य आणि हा जयद्रथ आहे. तुम्ही आमच्या पक्षावर बोलताय, मग तुमची भूमिका काय, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला सवाल केले. तसेच, तुम्ही आपल्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादीला विचारा, तुमचं म्हणणं आहे का ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे. सगळंच तुम्ही आमच्यावर घालताय, आमच्याच अंगावर ओबीसी समाज घालताय, मराठा समाज आमच्या अंगावर घालताय, आमच्याच अंगावर दलित बांधवांना घालताय, जणू काही आपण दुसऱ्या देशातून आलोय आणि येथील राजकारण उध्वस्त करायलोय, अशा शब्दात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुण्यातील वडगाव शेरी येथील भाजपा (BJP) पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांच्या (Sharad pawar) राष्ट्रवादीला लक्ष्य केले. 


तुम्हीच पक्षाचे सैनिक


लोकसभेला आपलं जे नुकसान झालंय ते भरुन काढायचं आहे. म्हणूनच, आपल्यासारख्या छोट्या छोट्या योद्ध्यांना पक्षाने मैदानात उतरवलं आहे. आता, पक्षासाठी आपण सर्वांनी जोमाने काम करायला हवं, सेनापती सांगत असतो पण सैनिकाला प्रत्यक्ष लढावं लागतं, तुम्ही सैनिक आहात, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांना आपापसातील मतभेद विसरुन पक्षासाठी काम करा, असे आवाहन येथील मेळाव्यातून केले. 


दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे. मात्र, यासंदर्भात राज्य सरकारच्यावतीने बोलावण्यात आलेल्या बैठकीला महाविकास आघाडीतील पक्षांनी दांडी मारली होती. त्यावरुन, आता महाविकास आघाडीची भूमिका काय, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या भूमिकेला त्यांचा पाठिंबा आहे का, असा सवाल सत्ताधारी विचारत आहेत. पंकजा मुंडेंनीही त्याच प्रश्नावरुन राष्ट्रवादीला लक्ष्य केलं. तसेच, भाजप कार्यकर्त्यांनाही आवाहन केलंय.